

उमरी ः शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गोवंश चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच नऊ जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एका नव्या कोऱ्या सिल्वर कलरच्या कारमधून चक्क तीन गोवंश चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी उमरी ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची हकिगत अशी की, दिनांक नऊ जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास गणेशनगर भागातील हनुमान मंदिर परिसरात दोन गायी व एक गोरे (तिघांची अंदाजे किंमत 55 हजार रुपये एवढी आहे) तेथे एका सिल्व्हर कलरची नवी कोरी कार आली. कारमधील चार व्यक्तींनी दोन गायी व एका गोऱ्याला बांधून कारमध्ये लोटले. त्यांना लोटताना अज्ञात चोरट्यांनी हातपाय बांधून शेपटीला ओढत कारमध्ये निर्दयीपणे मारहाण करत ढकलून कारचे दरवाजे बंद केले आणि तिन्ही गोवंशांना घेऊन कार सुसाट वेगात निघून गेली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला.
घटनेची हकिगत उमरी पोलिसांना कळविण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परंतु ती कार कुणाची होती, चोरटे कोण आहेत, ती कार कोठे व कुणीकडे गेली याचा तपास अद्याप लागलेला नाही. या प्रकरणी साहेबराव नरसिंग इंजेवाड यांच्या तक्रारीवरून उमरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपासून उमरी शहर व तालुक्यात गोवंशाची चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. नुकतेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या 33 गोवंशाची सुटका केली. या प्रकरणी जमादार अरविंद हैबतकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तळेगाव येथे गोमांस पकडण्यात आले. त्या प्रकरणाचाही गुन्हा दाखल झाला.
अनोख्या चोरीच्या प्रकारामुळे आश्चर्य
काही दिवसापासून उमरी शहर व जुन्या उमरी भागातील अनेकांची जनावरे चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. ट्रक मधून गोवंश चोरीला जात आहेत हे नवल नाही. परंतु चक्क एका नव्या कोऱ्या कारमधून गोवंश चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.