

Three arrested for robbing finance employees
मुदखेड, पुढारी वृत्तसेवा : भारत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याना खंजरचा धाक दाख-वून जबरी लूट करणाऱ्या तिघा जणांना मुदखेड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १ लाख ३५ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
भारत फायनान्स कंपनीचे कर्मचारी सतीश नारायणराव आहिले (२४) हे दि. २७ऑगस्ट रोजी वसूली करून कामळज मार्गे देवापूर रस्त्यावर आले असताना दुपारी १२:३० च्या सुमारास मोटारसायकलवर तिघे येऊन खंजरचा धाक दाखवून जबरी लूट केली. यात ५८ हजार ५२५ रुपये सॅमसंग कंपनीचा टॅब व बायोमेट्रिक डिवाइस घेऊन पळून गेले. घटनेची माहिती मुदखेड पोलिस ठाण्यात दिल्यानंतर मुदखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी विशेष पथकाची स्थापना केली.
अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक धीरज चव्हाण व पोलिस उपनिरीक्षक आकाश सरोदे यांच्या नेतृत्वाखाली गुप्त खबऱ्या मार्फत सदर गुन्ह्याचा छडा लावत गुन्ह्यातील तीन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी अजय राजू कोकरे (वय २१) राहणार कामळज ता. मुदखेड, आकाश मच्छिंद्र नवगिरे (वय १९) रा. आंबेडकर नगर नांदेड, रोहित राहुल केळकर (वय २४) रा. श्रावस्तीनगर नांदेड या तिघांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडून ३३ हजार ५६० रुपये नगदी, बजाज पल्सर मोटारसायकल अंदाजे किंमत ९० हजार रुपये, सॅमसंग कंपनीचा टॅब्लेट अंदाजे किंमत १२ हजार रुपये असा एकूण १ लाख ३५ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
चौथा आरोपी फरार
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून चौघांनी हा गुन्हा केला. चौथा आरोपी अजून फरार आहे. मुदखेड पोलिसांकडून चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे. खंजरचा धाक दाखवून जबरी लूट करणाऱ्यांना अटक केल्यामुळे पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.