

There is still no surplus water storage in the Sudha project this year
भोकर, पुढारी वृत्तसेवा : सुधा प्रकल्पाच्या उंची वाढविण्याचे काम सुरू असले तरी हे काम यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाली आहे. सांडव्याचे काम अपूर्ण असल्याने या वर्षी या प्रकल्पात अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध होणार नसल्याचे चित्र दिसून येत असून पुढच्या वर्षीपासून अतिरिक्त पाणी साठ्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे.
भोकर तालुक्यातील सुधा प्रकल्पाची १.१० मीटर उंची वाढविण्याच्या कामाला मंजुरी मिळाली. मंजुरी मिळाल्यानंतर उंची वाढविण्याच्या कामाला सुरुवात झाली असून हे काम जोमाने सुरू होते. पण या कामासाठी बुडीत क्षेत्रालगतच्या ६ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा अतिरिक्त भूसंपादनाचा मावेजा अद्यापपर्यंत मिळाला नाही.
या बाबत अतिरिक्त संपादित होणाऱ्या जमिनीचा अंतिम निवाडा घोषित झाला असून निवाड्याच्या ४० टक्के रक्कम उपविभागीय अधिकारी भोकरकडे वर्ग केला आहे. उर्वरित निधीची मागणी महामंडळ कार्यालयाकडे केली असल्याचे समजते. सदरील मावेजा जमा होण्याची प्रक्रिया चालू असली तरी या प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या अनुषंगाने इतर कामे अद्यापपर्यंत पूर्ण झाली नाहीत.
सदरील प्रकल्पाची उंची वाढविण्याचे काम पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्राअभावी मागील अनेक वर्षांपासून मंजूर नव्हते. सुधा प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्तावाला ६ जानेवारीला प्रशासकीय मान्यता मिळाली. १० कोटी १५ लक्ष ९९ हजार ६ रुपयांचा निधी मंजूर झाला होता. पण मातीधरण व सांडव्याच्या संकल्पचित्रातील बदलामुळे या किमतीत वाढ झाली आहे.
आता सुधा प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी आवश्यक होता. यासाठी ४१.३९ कोटी निधीची सुधारित मान्यता मिळाली. तद्वंतर या कामाला सुरुवात केली गेली. यावर्षी सुधा प्रकल्पाच्या उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाले नाही आणि सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हे शक्यही होत नाही. यामुळे या प्रकल्पात अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध होणार नाही.