

नांदेड : सार्वजनिक बांधकामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. येथे एका नागरिकाने नुकत्याच बांधलेल्या डांबरी रस्त्याला चक्क हातानेच उखडून काढले. सहजपणे उखडला जाणाऱ्या या निकृष्ट रस्त्याच्या व्हिडिओने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. ज्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा गलथान कारभार आणि भ्रष्टाचाराचे आणखी एक प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.
ही घटना नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात घडली असून या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकामांच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती अत्यंत सहजपणे रस्त्याचा पृष्ठभाग उखडताना दिसते. डांबराचा थर एखाद्या सतरंजीप्रमाणे उचलला जात असून, त्याखाली केवळ खडीचा कच्चा थर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
रस्ता उखडताना या नागरिकाने थेट सरकारला उद्देशून प्रश्न सवाल केले आहेत. या निकृष्ट कामाबद्दल न्यायाची मागणी केली आहे. तो म्हणतो, ‘माननीय मुख्यमंत्री, या रस्त्याचा दर्जा पाहा. या तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळणार का?’ त्याने पुढे सांगितले की, ‘डांबराच्या थराखाली ओली माती आहे, ही रस्त्याची अवस्था आहे. आम्हाला न्याय हवा आहे.’
स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की, रस्त्याच्या बांधकामासाठी अत्यंत कमी प्रमाणात डांबराचा वापर करण्यात आला आहे. तसेच, डांबरीकरणापूर्वी रस्त्याच्या खालील थराचीदेखील योग्य प्रकारे तयारी करण्यात आलेली नाही.
केवळ नांदेडच नव्हे, तर राज्यातील इतर भागांतूनही अशाच तक्रारी समोर येत आहेत. नाशिक जिल्ह्यातील दुगाव आणि पुणे जिल्ह्यातील डोंगरगाव परिसरात, केवळ महिनाभरापूर्वी तयार झालेल्या रस्त्यांवर आतापासूनच खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. डांबराचा अपुरा वापर आणि रस्त्याच्या मूळ थराचा निकृष्टपणा ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या घटनांमुळे सरकारी कामांच्या देखरेखीवर आणि कंत्राटदारांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.