

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: मागील पंधरवडा मराठी भाषेवरून प्रचंड गाजला असताना साहित्याच्या क्षेत्रात मात्र अनुवादित साहित्याला मोठी मागणी आहे. त्यातल्या त्यात गुजराती साहित्यिक ध्रुव भट, कानडी भाषेतून लिहिणाऱ्या लेखिका, मूळ मराठी खा. सुधा मूर्ती तसेच भैरप्पा यांचे अनुवादित साहित्य मराठी वाचकांत कमालीचे लोकप्रिय आहे. याशिवाय डॅन ब्राऊन व युआन नेवल हरारी या इंग्रजी लेखकांच्या साहित्याला मोठी मागणी आहे.
हिंदी भाषेच्या सक्तीला शिवसेना उबाठा व मनसे या पक्षांनी टोकाचा विरोध केला. प्रारंभी भाजपाने आपली बाजू लावून धरली; परंतु पाच तारखेला मोर्चाचे नियोजन झाल्यानंतर मात्र अचानक खेळी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसरी भाषा म्हणून हिंदीचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे मोर्चा रद्द करावा लागला; परंतु तयार झालेला टेम्पो कॅश करण्यासाठी - शनिवारी विजय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुंबईकरांनी मोठी गर्दी केली. अन्य भाजप व मित्रपक्षेतर राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा या मेळाव्याला आवर्जून हजेरी लावली.
या पार्श्वभूमीवर पुस्तक विक्रीच्या बाबतीत आढावा घेतला असता, तरुण मराठी मुलांमध्ये मराठी साहित्यापेक्षा इंग्रजी साहित्याकडे ओढा असल्याचे दिसून येते. त्यात डैन ब्राऊन, चेतन भगत व सुधा मूर्ती यांच्या इंग्रजी व अनुवादित साहित्यालाही मागणी आहे. युआन नेवल हरारी या इंग्रजी लेखकाच्या पुस्तकांना चांगला बाजार असल्याचे अभंग पुस्तकालयाचे एक संचालक उमेश कस्तुरे यांनी सांगितले. इतिहास व भविष्यातील चित्रण हे या लेखकाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या प्रामुख्याने सेपीयंस या पुस्तकाला मोठी मागणी दिसते.
दरम्यान गुजराती लेखक ध्रुव भट यांच्या तत्वमासी व अतरापी या अनुवादित पुस्तकांचा खूप चांगला खप आहे. यांचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तके अगदी छोटी म्हणजे शंभर ते दोनशे पानांची असतात. त्यामुळे तरुणांना ती बोजड वाटत नाहीत. मूळ मराठी असलेल्या व इन्फोसिस चे संचालक के नारायण मूर्ती यांच्या अर्धांगिनी खा. सुधा मूर्ती यांच्या पुस्तकांनाही मोठी मागणी आहे. त्यांची सर्वच पुस्तके वाचकप्रिय म्हणून नोंदली गेली आहेत. साधी सोपी भाषा व प्रोत्साहित करणारे विषय, यामुळे त्यांचे लेखन वैशिष्ट्यपूर्ण ठरते. एच. एल. भैरप्पा या प्रसिद्ध लेखकांच्या अनुवादीत साहित्यालाही मोठी मागणी आहे.
मराठी पुस्तकांच्या एकूण बाजारपेठेतील युवकांची मागणी लक्षात घेता ७० ते ८० टक्के वाचकांचा अनुवादित पुस्तके वाचण्याकडे कल दिसून येतो. चटकन ओठावर येईल असे मराठी नाव पुढे येत नाही. याबाबत मराठी साहित्यातील लेखकांनी अंतर्मुख होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नांदेडचे मनोज बोरगावकर असे एखादे अपवादात्मक नाव की ज्यांचे लेखन मराठीत तर वाचक प्रिय झालेच परंतु अन्य दोन-तीन भाषांत त्याचे भाषांतर झाले. शैंपेन हे त्याचे ताजे उदाहरण. याशिवाय मृत्युंजय, स्वामी व पु ल देशपांडे यांची साहित्य संपदा या सर्वकालीन वाचकप्रिय पुस्तकांना मात्र आजही मागणी कायम असल्याचे सांगण्यात येते.
इंग्रजीतून लिहिणाऱ्या भारतीय लेखकांपैकी चेतन भगत, सुधा मूर्ती व अन्य काही लेखक आहेत. सुधा मूर्ती यांची इंग्रजी भाषा समजायला सोपी आहे. त्यांतील व्यक्तिरेखा सुद्धा अगदी नेहमीच्या वावरातील असल्याने तरुण वाचकांना ती जवळची वाटतात.