

Gang of burglars arrested, four guns and Rs 7 lakh seized
नांदेड, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातच नव्हे तर - लगतच्या तेलंगणा राज्यात शस्राचा धाक दाख वून घरफोडी तसेच मोटर सायकल चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करीत पोलिसांनी सात आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल चार गावठी बंदुका, एक मॅक्झीन व सात जिवंत काडतुसे असा सात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. शहराच्या वेगवेगळ्या भागात घडणाऱ्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत विशेष पथक स्थापन करण्यात आला.
याच पथकाने अमन किशोर जोगदंड (वय २१, रा. खोब्रागडेनगर), राहुल माणिका लिंगायत (वय २३, रा. भोकर), महंमद अफताब (वय २१, रा. मुदखेड), शेख मोबीन शेख गौस (वय २५, रा. खुदबईनगर, नांदेड), संजय दत्ता गुंडेवार (वय ३०, नंदीग्राम सोसायटी), रोहित ताटीमा पूलवार (वय २१ रा. चौफाळा, नांदेड) व राहुल चंद्रकांतराव (वय २५, रा. आंबेडकरनगर, भोकर) या सात जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले.
या आरोपींनी भाग्यनगर, विमानतळ, शिवाजीनगर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, तेलंगणा राज्यातील मुधोळ, बासर, तनूर व बोधन येथे चोरीच्या घटनांची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सोन्याचे गंठन, रोख रकम, एक मोबाईल, एक मोटारसायकल, चार लोखंडी बंदुका, एक मॅग्झीन, ७ जिवंत काडतुसे व अन्य सोन्याचे साहित्य असा सात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यातील काही आरोपीविरुद्ध यापूर्वीच गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार गुन्हयांची उकल या निमित्ताने होणार आहे. स्थागुअचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाने गेल्या आठ दिवसांपासून आरोपींच्या अटकेसाठी सातत्याने प्रयत्न केले.