

Kundalwadi illegal cattle transport Telangana
कुंडलवाडी: बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी पोलिसांनी जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडून दोघांना ताब्यात घेतले. १४ टायर ट्रक (एम.पी ०७ एचडी ७६८०) मधून २६ गोवंश जनावरांना गुंगीचे औषध देवून कत्तल करण्याच्या उद्देशाने धर्माबाद मार्गे तेलंगणात नेत असताना ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
चालक रशीद मोहम्मद करीमोद्दीन (रा. इस्लामपुरा, तहसील मालपुरा, जिल्हा टौंक, राजस्थान) क्लीनर खव्युमखाँ जुम्माखाँ चाँद (रा. ढाणी इस्लामपुरा, तहसील मालपुरा, जिल्हा टौंक , राजस्थान) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
बिलोलीकडून धर्माबादच्या दिशेने जनावरांना घेऊन ट्रक जात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कुंडलवाडीचे सपोनि ज्ञानेश्वर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गजेंद्र मांजरमकर, गफुर शेख, नागेंद्र कांबळे, शेषेराव खनपटटे, रघुवीर चौहान यांनी शेळगाव (थडी) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सापळा रचला. आणि ट्रक पकडला.
ही जनावरे ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथून चोरुन निजामाबाद व साटापूर (तेलंगणा) येथे कत्तलीसाठी नेत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडून ट्रक व २६ विविध जातीची जनावरे, ९ इंजेक्शन्स असा एकूण ३१ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर करत आहेत.