

The morning track, part of the BJP's development plan, is in a dilapidated condition
विशेष प्रतिनिधी
नांदेड : नांदेड-वाघाळा मनपाच्या निवडणुकीसाठी विकसित नांदेडचा संकल्पनामा शहरवासीयांसमोर सादर करताना भाजपाने आपल्या संकल्पपू-र्तीत ज्या चालण्याच्या मार्गाचा (वॉकिंग ट्रॅक) आणि या मार्गावरील बगीचाचा आवर्जून उल्लेख केला होता, त्या मार्गाची काही महिन्यांतच दुरवस्था झाली असून त्याकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी या मार्गावर दररोज सकाळची फेरी मारणाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
जाणाऱ्या विमानतळाकडे चैतन्यनगर ते कामगार चौक या मार्गावरील विमानतळाच्या भींतीलगत गतवर्षी लाखो रूपये खर्च करून २.५ कि.मी. लांबीचा वॉकिंग ट्रॅक तयार करतानाच या मार्गावर सुशोभित उद्यान विकसित करण्यात आले आहे.
त्यातच ओपन जीमची व्यवस्थाही करण्यात आल्यामुळे या मार्गावरून सकाळची फेरी नियमित करणाऱ्यांची चांगली सोय झाली; पण संबंधित यंत्रणेकडून देखभाल नसल्यामुळे या मार्गाची दुरवस्था झाली आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग, दारूच्या रिकाम्या बाटल्या, भटक्या कुत्र्यांचा संचार असे दृश्य तेथे बघायला मिळाल्यानंतर साहित्यिक-पत्रकारांसह काही जागरुक नागरिकांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी (३० जानेवारी) उपोषण करण्याचा मनोदय जाहीर केला.
ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे, जगदीश कदम, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी अशोक देवकरे, प्रा. आत्माराम चव्हाण, पत्रकार आनंद कल्याणकर आदींच्या पुढाकारातून नुकतीच बैठक झाली. या वॉकिंग ट्रॅकची देखभाल चांगल्याप्रकारे व्हावी, तेथे नियमित साफसफाई करण्यात यावी, झाडांची योग्य ती निगा राखली जावी इ. मागण्या बैठकीतून समोर आल्या. या सर्वांनी एक गट तयार केला असून या गटातर्फेच संबंधितांकडे निवेदन सादर करण्यात आले.
भाजपाच्या राज्यात काँग्रेसचे गवत !
मनपा निवडणुकीच्या भाजपाच्या जाहीरनाम्यात वरील वॉकिंग ट्रॅकचा उल्लेख शहरातील सौंदर्यस्थळांमध्ये करताना संपादक संतुका पांडागळे यांनी छायाचित्रांचा वापर अत्यंत कुशलतेने केला. त्यावरून हैदराबादमधल्या अशाच एका वॉकिंग ट्रॅकची आठवण अनेकांना झाली; पण आता याच वॉकिंग ट्रॅकवर भटके श्वान शांतपणे विश्रांती घेत आहेत. हिरवळीवर कचऱ्याची पिशवी टाकली जात आहे आणि भाजपाच्या राज्यात या मार्गावर काँग्रेस (गाजर) गवत उगवल्याचे दिसत आहे.