

A bribe of 3,000 rupees was demanded for a power connection
नांदेड, पुढारी वृत्तसेवा वीज बिल थकल्यामुळे खंडित केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील एका तक्रारदाराचा वीज पुरवठा थकबाकीमुळे तोडण्यात आला होता. हा पुरवठा पुन्हा जोडण्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ साईनाथ कांचणे (वय ४४) तसेच कपिल माधव देवके (वय ३५, खासगी इलेक्ट्रिशियन) या दोघांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला साडेचार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३ हजार रुपये देण्याचे ठरले.
एसीबीचा बाचेगाव शिवारात सापळा तक्रारदाराने या प्रकाराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पथकाने उमरी तालुक्यातील बाचेगाव येथे सापळा रचला.
वरिष्ठ तंत्रज्ञ कांचणे याच्या सांगण्यावरून खासगी इलेक्ट्रिशियन देवके याने तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक प्रीती जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.