Nanded Rain : नांदेडमध्ये 'गोदावरी'चे पात्र फुगले; नदीकाठच्या भागांत पाणी पसरले !

अनेक वस्त्या-वसाहतींना झळ : एकाचा मृत्यू
Nanded Rain
नांदेडमध्ये 'गोदावरी'चे पात्र फुगले; नदीकाठच्या भागांत पाणी पसरले ! File Photo
Published on
Updated on

The Godavari river swelled in Nanded; water spread in the riverbank areas!

विशेष प्रतिनिधी

नांदेड : मागील तीन दिवसांत जिल्ह्यात साधारण पाऊस झाला, तरी नांदेड शहरालगतच्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा प्रचंड येवा सुरू झाल्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना फुगलेल्या आणि वाहणाऱ्या 'गोदावरी'चे दर्शन बुधवारी घडले. पूरस्थिती नसली, तरी पूरसदृश परिस्थितीमुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले. नांदेडमध्ये एका युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला; पण मदतकार्यातील यंत्रणेमुळे २३ पाळीव श्वानांना जीवदान मिळाले.

Nanded Rain
Nanded news: हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण मिळावे; बंजारा समाजाचा मोर्चा

नांदेडसह सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू असताना हस्तापूर्वीच्या उत्तरा नक्षत्राने जोरदार तडाखा दिला. विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागातील जायकवाडीपासूनच्या वेगवेगळ्या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे बुधवारी गोदावरी नदीचे रौद्ररूप बघायला मिळाले. विष्णुपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे एकाचवेळी उघडण्याचा प्रसंग तब्बल १६ वर्षांनंतर उद्भवला. या प्रकल्पातून २ लाख ६१ हजार क्युसेक या प्रवाहाने पाण्याचा विसर्ग करावा लागला. मंगळवारी रात्रीनंतरच पाणीपातळी वाढत गेल्यामुळे बुधवारी दिवसभर जुन्या नांदेडमधील अनेक भागांना झळ सोसावी लागली. बुधवारी दुपारी गोदावरी नदीने शहरात धोक्याची पातळी (३५३ मीटर) गाठली होती.

नांदेडच्या मध्यवर्ती भागातील गोवर्धन घाट तसेच जुन्या नांदेडमधील नावघाट पूल पाण्याखाली गेलेला असून नदीकाठच्या मनपा हद्दीतील खडकपुरा, दुल्हेशाह रहमाननगर, जी.एम. कॉलनी, गाडीपुरा, गंगाचाळ, भीमघाट, नावघाट, बिलालनगर, पाकीजा नगर, शंकरनगर, वसरणी इत्यादी सखल भागातल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याची माहिती नांदेड मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

Nanded Rain
Isapur Sanctuary | इसापूर अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनासाठी ४६ कोटींचा निधी मंजूर; २२० हेक्टर भूसंपादन होणार

वसरणीच्या पंचवटीनगर येथे मनपाच्या अग्निशमन पथकाने अडकलेल्या एका महिलेस सुरक्षितपणे बाहेर आणले. त्याच भागात २३ पाळीव श्वानांचाही बचाव करण्यात आला. पण सैलाबनगर भागात मिनाज साजीद बागवान या १५ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून अंत झाला. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नांदेड-वाघाळा मनपाने शहराच्या वेगवेगळ्या भागात निवारा केंद्रांची सोय केली असल्याचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी सांगितले. आतापर्यंत सुमारे ३०० नागरिकांना निवारा केंद्रामध्ये हलविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाकडे बुधवारी सायंकाळी विचारणा केली असता गोदावरी नदीकाठच्या वेगवेगळ्या गावांलगतच्या शेतांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर शिरले. पण तेथील पीके आधीच उद्ध्वस्त झाल्यामुळे नव्याने कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. नांदेड शहरातील एक मृत्यू वगळता इतरत्र जीवितहानी झाली नसल्याचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news