

Nanded Banjara morcha ST reservation demand news
हदगाव: महाराष्ट्रातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण मिळावे, या मागणीसाठी २३ सप्टेंबर रोजी हदगावात विराट मोर्चा काढण्यात आला. बंजारा समाजाच्या विविध संघटना आणि बांधवांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. याच अनुषंगाने, हैदराबाद गॅझेटमध्ये 'बंजारा' जमातीचा 'आदिम' जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे, त्यांना अनुसूचित जमातीमध्ये (ST) समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे. स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजावर मोठा सामाजिक अन्याय झाला असून, त्यांना व्हीजेएनटी (VJNT) आणि केंद्रात ओबीसी (OBC) प्रवर्गात ठेवण्यात आले आहे, असेही या मोर्चात नमूद करण्यात आले.
शांततेच्या मार्गाने काढलेल्या या मोर्चासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चाच्या वेळी हदगाव-तामसा रोडवरील वाहतूक सुमारे दोन तास थांबली होती. या मोर्चात प्रा. कैलास राठोड, डॉ. बी. डी. चव्हाण, प्रकाश राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.