

Isapur sanctuary 46 crore fund approved
प्रशांत भागवत
उमरखेड : उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरण परिसरातील जंगलात प्रस्तावित इसापूर पक्षी व वन्यजीव अभयारण्य निर्मितीला गती प्राप्त झाली आहे. राज्य शासनाच्या वतीने वनविभागाच्या अंतर्गत येणार्या गावांच्या पुनर्वसनासाठी ४६.०७ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. यामुळे इसापूर वन्यजीव अभयारण्यातून गावांचे पुनर्वसन करण्याच्या कामाला गती मिळणार आहे.
अभयारण्यातील पुनर्वसनासाठी ४६ कोटी ७ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकूण २२० हेक्टर क्षेत्राचे भू-संपादन करण्यात येणार असून या क्षेत्रातील गावांच्या पुनर्वसनाला वेग येणार आहे. वन्यजीव विभाग इसापूर अभयारण्यात विविध सुविधा उभारण्यासोबतच अभयारण्यात पुनर्वसनासाठी मागणी करीत होता. या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाने या कामासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे अभयारण्यात येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन होऊन जंगला बाहेर नेले जाणार आहे. गावांच्या पुनर्वसनाची कामे आता जलद गतीने होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात इसापूर वन्यजीव अभयारण्य पसरलेले आहे. या अभयारण्यात विविध प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास असून हिरण, चितळ, सांबर, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा, अस्वल आदी प्राण्यांसह विविध प्रजातींचे पक्षी आढळतात. निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे अभयारण्य आकर्षणाचे ठिकाण आहे.
अभयारण्यात सालई, आंबा, तेंदू, ऐन, मोहा, बेल, बहावा, काटेसावरी, धावंडा, बिहळा, कडुलिंब, करंज, बाभूळ, खैर, बिब्बा, वड, पिंपळ, चिंच, उंबर, शिवण, गोंदण, अंजन, धावडा, खैर आदी झाडांचा समावेश आहे.
या अभयारण्यात मोठ्याप्रमाणात पक्षांचे वास्तव्य आहे. यात कावळा, चिमणी, कबूतर, पारवा, पोपट मैना, साळुंकी, घुबड, ससाणा, कोकीळ, बगळा, राघू, (ड्रॉन्गो) धनेश, कावळी (जंगली कावळा), गरुड, मोर, तित्तर, बटेर, करकोचा, बुलबुल, सूर्यपक्षी, कावला (जंगल crow पेक्षा लहान) ढोक, (वुडपेकर/सुतार पक्षी) राघू, शिक्रा, टिटवी (लॅपविंग) आदी जवळपास २५ ते३० प्रकारचे पक्षी या अभयारण्यात मुक्तसंचार करतात. अभयारण्याच्या काठावरच ईसापूर धरणाचा जलाशय असल्याने त्या ठिकाणी विविध स्थलांतरित पक्षीही येत असतात. पक्षीप्रेमींना या ठिकाणी निरीक्षणाची व अभ्यासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.