

The cricket field is the same; BJP's new tactics on it
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नागेली येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ नुकत्याच पार पडलेल्या खासदार क्रिकेट चषकात काँग्रेसने जोरदार राजकीय षटकार मारल्यानंतर आता भाजपच्या गोविंदराव नागेलीकर यांचे राजकीय मनसुबे उफाळून वर आले असून शिवजयंतीच्या मुहूर्तावर त्याच मैदानावर क्रिकेटपटूंना पुन्हा उतरवत खेळाआड राजकीय फिल्डिंग सुरू केली आहे.
नागेलीत क्रिकेटचे मैदान तेच; परंतु भाजपाच्या वतीने नवा डावपेच आखला गेला आहे. काँग्रेसच्या क्रिकेट सोहळ्यामुळे भाजपा बॅकफूटवर गेल्याने राजकीय हेतुने प्रेरित होऊन भाजपाने लागलीच क्रिकेट सामने आयोजित केल्याची खरमरीत टीका काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दादाराव पाटील पुयड यांनी दिली आहे.
नागेली येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ काँग्रेसच्या वतीने खासदार क्रिकेट चषक आयोजित करण्यात आला होता. खा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नुकताच पारितोषिक वितरण सो हळाही पार पडला. रस्त्यावरच क्रिकेटचे मैदान असल्यामुळे येथील गर्दी जिल्हा बँकेचे संचालक गोविंदराव नागेलीकर यांच्या नजरेत येत होती.
त्यामुळे काँग्रेसच्या चषकानंतर नागेलीकर यांनी लागलीच भाजपाच्या टीमला कामाला लावत स्वतः प्रथम विजयी संघास २१ हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. शिवजयंतीच्या मुहुर्तावर क्रिकेट सोहळ्याचे उद्घाटनही गोविंदराव नागेलीकरांनीच उरकले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दादाराव पाटील पुयड यांच्या जोरदार राजकीय फलंदाजीमुळे भाजपाच्या गोविंदराव नागेलीकरांना क्रिकेटच्या मैदानात राजकीय फिल्डिंग करायची वेळ आल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.
ग्रामीण भागात आता जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या गोविंदराव नागेलीकर यांना जिल्हा परिषदेच्या राजकीय आखाड्यात टिकण्यासाठी आता खेळाच्या मैदानातही उतरावे लागले आहे. क्रिकेटच्या आड का होईना काँग्रेसच्या दादाराव पुयड यांनी अनुभवी गोविंदराव नागेलीकर यांना खेळाच्या मैदानात खेचल्याने गावच्या पारावर खुमासदार राजकीय चर्चा सुरू आहेत.