

Talathi beats up Tehsildar; Case registered
नांदेड : अर्धापूर तालुक्यात वाळुची तस्करी रोखण्यासाठी पथकासह कर्तव्यावर असलेल्या तहसीलदाराला तलाठ्याने चांगलेच बदडले हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी तर गांभिर्याने घेतलेच परंतु अर्धापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
त्याचे झाले असे की, अर्धापूरचे प्रभारी तहसीलदार आर.डी. शिंदे दि. ५ डिसेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास वाळुच्या अवैध वाहतुकीवर करडी नजर ठेवून होते. पिंपळगाव (म.) येथून वाळू वाहतूक करणा-या तीन हायवा आणि एक टिप्पर त्यांनी ताब्यात घेतले.
यावेळी तलाठी प्रदीप उबाळे याने तहसीलदारावर अचानक हल्ला चढवला. काही कळायच्या आत तहसीलदारांना मारहाण झाली. या बाबतीत तहसीलदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तहसीलदाराच्या अधिनस्त कनिष्ठ कर्मचा-याने वरिष्ठ अधिकाऱ्यावर अवैध वाळू सारख्या विषयात हस्तक्षेप करत हल्ला करणे हा गंभीर प्रकार असून जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी ही बाब अतिशय गांर्भियाने घेतली आहे.