

राजेंद्र कांबळे
नांदेड : अगोदर अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पीक हातचे गेले, शासनानेही तुटपुंजी मदत केली. आणि आता दिवाळीच्या तोंडावर अज्ञात समाजकंटकाने सोयाबीनच्या ढिगाला आग लावून एका शेतकऱ्याचे अंदाजे 60 हजार रुपयांचे नुकसान केले आहे. बिलोली तालुक्यातील बडूर येथील शेतकरी तिरुपती गणपतराव गजलवाड यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली असून, यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
अतिवृष्टीच्या संकटातून सावरत असताना, बडूर येथील भूधारक शेतकरी तिरुपती गजलवाड यांनी बामणी शिवारात असलेल्या आपल्या साडेतीन एकर शेतातील उरल्या-सुरल्या सोयाबीन पिकाची कापणी केली होती. रविवारी (दि. १२ ऑक्टोबर) दिवसभर कापणी करून त्यांनी शेतातच सोयाबीनचा ढिग रचला आणि सायंकाळी घरी गेले. परंतु, रात्रीच्या सुमारास कोणीतरी विचित्र मनोवृत्तीच्या अज्ञात व्यक्तीने या ढिगाला आग लावली आणि तो पेटवून दिला. यात सुमारे १५ क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले असून, सध्याच्या बाजारभावाने याची किंमत जवळपास ६०,००० रुपये इतकी आहे.
या घटनेमुळे मुलांचे शिक्षण, दिवाळीचा सण, बँक व सावकारी कर्जाची परतफेड अशा अनेक समस्यांचा सामना करत असलेल्या गजलवाड कुटुंबाचा तोंडचा घास हिरावला गेला आहे. जगावे की मरावे अशा द्विधा मनःस्थितीत ते सापडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्याने तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी पंचनामा केला आहे. या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे झालेल्या नुकसानीची शासनाने तातडीने दखल घेऊन मदत करावी, अशी मागणी शेतकरी तिरुपती गजलवाड यांनी केली आहे.