

उदगीर ( लातूर ) : उदगीर तालुक्यातील बोरगाव व धडकनाळ येथे झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्याचा फटका सुमारे 900 हेक्टर्सला बसला असून त्यातील 225 हेक्टर्स शेतजमीनीतील माती पुराच्या प्रवाहाने पूर्णपणे वाहून नेली असल्याने ती जमीन आता शेतीयोग्य राहीली नाही. पशुधनासही मोठा फटका बसला असून प्रशासन व स्वयंसेवी संस्था गावकर्यांची सर्वतोपरी काळजी घेत असल्याची माहिती उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे पुढारीशी बोलताना दिली.
शिंदे म्हणाले या आक्समात आपत्तीने ही गावे भरडली गेली आहेत. गावकरी झोपेत असताना अचानक 130 मीमीच्या पुढे पाऊस बरसला. या गावानजीक असलेल्या ओढ्याला मोठा पुर आला. त्याचे पाणी या गावांच्या घरा- गोठ्यांनी शिरले. माणसे कसीबशी बाहेर पडली, सुरक्षीत स्थळी गेली परंतु त्यांना त्यांचे पशुधन नेता आले नाही. घरा- गोठ्यांत पाच फुट पाणी थांबले.
गोठ्यात बांधलेली अनेक गुरे - तोडांत पाणी जावू जागीच मरण पावली. प्राथमिक पहाणीत सुमारे 270 गुरे दगावल्याचे कळाले असून त्यात सव्वादोनशे शेळ्या आहेत. म्हशी- गायीही मरण पावल्या आहेत. गुरांचे मृतदेह पुरण्यात आले आहेत. तसेच खबरदारी म्हणून जीवंत गुरांचे लसीकरण सुरू आहे. या गावातील सुमारे 325 गावकर्यांना गावातील मंदीर ,शाळा येथे स्थलांतरीत करण्यात आले असून तेथेच त्यांच्या निवास व भोजनाची सोय करण्यात आली आहे. या कार्यात स्वंयसेवी संस्थाची मोठी मदत होत असल्याचे शिंदे यांनी सांगत या संस्थाप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. आपत्ती पश्चात रोगराई पसरू नये याची खबरदारी घेतली जात आहे. गुरांचे लसीकरण करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरीक, लहान मुले, गरोदर महिलांची प्रत्यक्ष गृहभेटीतून आरोग्य तपासणी होत असून आठ दिवस ती सुरू राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. शेती व घरांचे पंचनामे सुरू असून मंगळवारी (दि.19) पाऊस ओसरल्याने या कामास गती आली होती.