

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः नांदेड-वाघाळा मनपा निवडणुकीच्या प्रचारामध्ये नांदेडमधील पायाभूत सुविधा तसेच या महानगरातून झालेल्या दळणवळणाच्या सुविधांचा मुद्दा लोकांसमोर मांडला जात असतानाच येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी विमानतळावरून ‘फ्लाय-91’ या कंपनीची विमानसेवा लवकरच सुरू होत असल्याची माहिती भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून दिली आहे.
मनपा निवडणुकीसाठी भाजपाने जारी केलेल्या जाहीरनाम्यामध्ये नांदेड विमानतळ हे हवाई वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र झाल्याचे नमूद करून गेल्या वर्षभरात या विमानतळावरून देशातील प्रमुख महानगरांमध्ये विमानसेवा सुरू झाली, याकडे लक्ष वेधण्यात आले. सध्या स्टार एअर ही कंपनी विमानसेवा देत आहे. पुढील काळात फ्लाय-91 कंपनीतर्फे नांदेड-गोवा विमानसेवेचा शुभारंभ अपेक्षित असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. भविष्यात नांदेडहून तिरुपती तसेच कोल्हापूरला जाण्यासाठीही विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे भाजपातर्फे सांगण्यात आले आहे.
आघाडी सरकारमध्ये बांधकाममंत्री असताना अशोक चव्हाण यांनी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी जालना-नांदेड या नवीन द्रूतगती महामार्गाच्या कामास मंजुरी मिळवून घेतली होती. नंतरच्या काळात त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर या नव्या महामार्गासाठी बराच पाठपुरावा केल्यानंतर प्रस्तावित काम नांदेड जिल्ह्यामधून सुरू झाले आहे. येत्या काही वर्षांत नांदेडहून मुंबईला अवघ्या आठ तासांत पोहोचता येईल, असे भाजपाने सांगितले आहे.
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सोमवारी येथे घेतलेल्या जाहीर सभेमध्ये जालना-नांदेड महामार्गाचा उल्लेख आवर्जून केला. हे काम पूर्ण झाल्यानंतर नांदेड शहराला औरंगाबाद-जालन्यानंतरचे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र करण्याचा मनोदयही त्यांनी जाहीर केला. नांदेड भाजपाने जारी केलेल्या जाहीरनाम्यातील प्रत्येक संकल्पाची पूर्ती करण्यास आम्ही प्राधान्य देऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.