

विशेष प्रतिनिधी
नांदेड ः नांदेड मनपाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांमधील बेबनाव आणि वाद प्रभाग क्र.3 मधील एका महिला उमेदवारावरून चव्हाट्यावर आल्यानंतर पक्षाचे संपर्कप्रमुख सिद्धराम म्हेत्रे मंगळवारी येथे आले. त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातच वरील प्रभागातील शिवसैनिकांनी आमदार हेमंत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला.
नांदेड उत्तर मतदारसंघात शिवसेनेचे बहुसंख्य उमेदवार या भागाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी निश्चित केल्यानंतर पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या मीनल पाटील यांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांच्या उमेदवारीला हेमंत पाटील व बाबूराव कदम कोहळीकर या आमदारद्वयांनी पाठिंबा देत मीनल पाटील यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनास उपस्थिती लावतानाच त्यांच्या उमेदवारीचे जोरकसपणे समर्थन केल्यामुळे स्थानिक पातळीवरील हा वाद थेट वरपर्यंत गेला.
शिवसेनेतील वादाची वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमध्ये चर्चा सुरू असतानाच नांदेड उत्तरमधील पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी दुपारी झाले. आ.हेमंत पाटील यांचे वास्तव्य याच भागात असले, तरी ते या कार्यक्रमास उपस्थित नसल्याचे दिसून आले. या कार्यक्रमास प्रभाग क्र.3मधील अनेक शिवसैनिक उपस्थित होते. मीनल पाटील यांच्या बंडखोरीवरून त्यांनी आपला राग व्यक्त करताना आ.हेमंत पाटील यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केल्यानंतर आ.कल्याणकर यांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांना शांत केले.
नांदेड उत्तर मतदारसंघात ज्या कट्टर शिवसैनिकांवर अन्याय झाला त्यांच्या पाठिशी आपण उभे राहणार असल्याचे आ.हेमंत पाटील यांनी सोमवारी जाहीर केले होते. त्यावरून कल्याणकर समर्थक संतापल्याचे दिसून आले. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधातील उमेदवाराच्या प्रचाराचा नारळ दुसऱ्या दोन आमदारांनी फोडल्याबद्दल आ.कल्याणकर यांनी खेद व्यक्त केला.