

संजीव कुळकर्णी
नांदेड : दूरसंचार विभागातील नोकरीतून लेखनाकडे वळालेल्या काही व्यक्ती साहित्य-संशोधन क्षेत्रात विख्यात झाल्या आहेत. शंभराव्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले ज्येष्ठ लेखक शरणकुमार लिंबाळे यांचा लेखन प्रवासही वरील विभागाच्या अहमदपूर (जि.लातूर) येथील नोकरीदरम्यान सुरू झाला.
छत्रपती संभाजीनगरातील लेखक आणि एमजीएम विद्यापीठाचे पहिले कुलगुरू प्रा.डॉ.सुधीर गव्हाणे आणि प्रा.डॉ.लिंबाळे हे दोघेही सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात अहमदपूरच्या दूरध्वनी केंद्रात ऑपरेटर पदावर कार्यरत होते. तेथील वास्तव्यातच लिंबाळे यांचा ‘उत्पात’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. गव्हाणे यांनी त्यात त्यांना मदत केली. साहित्य संस्कृती मंडळाकडून मिळालेल्या अनुदानातून लिंबाळेंची पहिली साहित्यकृती १९८२ साली वाचकांसमोर आली.
१९५६ साली जन्मलेल्या लिंबाळे यांनी अतिशय अभावग्रस्त वातावरणात कळत्या वयापासून लेखन सुरू केले. समकालीन लेखक मित्रांना ते आपले लेखन वाचायला लावत, मित्रांशी चर्चा करीत असत. त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहावर नरहर कुरुंदकर, डॉ.जनार्दन वाघमारे प्रभृतींनी कौतुकाची थाप दिली. त्यानंतर दोनच वर्षांनी ‘अक्करमाशी’ या आत्मकथनामुळे लिंबाळे यांचे नाव महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून इतर प्रांतांमध्येही पोहोचले. डॉ.वाघमारे तसेच गंगाधर पानतावणे या नामवंतांनी अक्करमाशीची ठळक नोंद घेतली.
लिंबाळे आणि गव्हाणे या दोघांनी कालांतराने दूरसंचार विभागाच्या नोकरीस रामराम ठोकला. नंतरची काही वर्षे त्यांचा आकाशवाणीशी संबंध आला. दोघांनीही वेगवेगळ्या विद्यापीठांतून पी.एचडी. प्राप्त केल्यानंतर ते अध्यापन कार्याशी जोडले गेले. लिंबाळे यांची महत्त्वाची नोकरी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात झाली. गव्हाणे काही काळ या विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू होते. दोघेही लेखक म्हणून नामांकित झाले.
केंद्र किंवा राज्य सरकारच्या नोकरीतून मराठी साहित्य विश्वात लेखक म्हणून अनेक नावे पुढे आली. महसूल सेवेतील लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे, विश्वास पाटील हे अलीकडच्या काळात अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. कुलगुरू राहिलेले डॉ.नागनाथ कोत्तापल्लेही संमेलनाध्यक्ष झाले. आता या यादीत ‘दूरसंचार’च्या नोकरीची पार्श्वभूमी असलेले शरणकुमार लिंबाळे यांचे नाव विराजमान झाल्यानंतर प्रा.गव्हाणेंसह नांदेडचे जगदीश कदम, देवीदास फुलारी प्रभृतींनी आनंद व्यक्त केला.
फुलारी हे सध्या साहित्य महामंडळावर मराठवाडा साहित्य परिषदेचे एक प्रतिनिधी आहेत. त्यांनीही दूरसंचार विभागात टेलिफोन ऑपरेटर पदापासून नोकरीची सुरुवात केली. शेवटी याच विभागातून ते निवृत्त झाले; पण या दरम्यान मराठवाड्याच्या साहित्य विश्वात कवी, कादंबरीकार आणि वक्ते म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला. दिवंगत कवी कल्याण इनामदार तसेच वसंत वैद्य यांनी सुद्धा दूरसंचार विभागात नोकरी केली होती, अशी माहिती यानिमित्ताने समोर आली.
‘अक्करमाशी’चा अनेक भाषांमध्ये अनुवाद!
शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘अक्करमाशी’ आत्मकथेची पहिली आवृत्ती १९८४ साली प्रकाशित झाली. त्यानंतर २०२४ पर्यंत या आत्मकथेच्या ११ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या आत्मकथेेचे हिंदी, कन्नड, पंजाबी, गुजराथी, मल्याळम, तमिळ, उर्दू, तेलुगू, ओडिया, बंगाली आणि इंग्रजी इत्यादी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. भालचंद्र नेमाडे यांनीही या आत्मकथेची विशेष नोंद घेतली होती.