

नांदेड : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कर्जमाफीच्या जी.आर. मध्ये अनेक त्रुटी व अटी आहेत. परिणामी असंख्य शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असून शेतकरी विरोधी व अहंकारी सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून झुकवावे लागणार आहे. त्यासाठी 29 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता छत्रपतीत संभाजीनगर येथे मोठे शेतकरी आंदोलन होणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी वार्ताहर बैठकीत दिली.
सरकारविरुद्ध आवाज उठविण्यासाठी व या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी आ. रोहित पवार मराठवाडा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी लातूर येथील कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा त्यांचे नांदेड येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात वार्ताहर बैठकीत बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्हाला कुठलेही राजकारण करायचे नाही, असे सांगताना आ. पवार म्हणाले, पंढरपूर येथे उपोषणास बसलो असता मंत्री गिरीश महाजन यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते.
महाजन यांनी मुख्यमंत्र्यांकडूनही शब्द घेतला होता. आश्वासन दिल्यामुळे चर्चा होईल, मार्ग निघेल, असे वाटले होते, त्यामुळे आम्ही उपोषण स्थगित केले. परंतु दुर्दैवाने आश्वासन पाळले नाही. अधिवेशन सुरू झाले, तरी चर्चेला बोलावले नाही सरकारने अर्धवट कर्जमाफी केली आहे. जी.आर. मधील त्रुटी, अटी रद्द कराव्यात आणि सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे, त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे मोठे आंदोलन होणार आहे. शेतकरी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मराठवाड्यातील पक्ष पदाधिकारी व मित्रपक्षांशी चर्चा केली जात असल्याचेही आ. पवार यांनी सांगितले.
अधिवेशनात एकाधिकारशाही
आ. रोहित पवार यांनी शुक्रवारी सकाळी सचखंड गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, हे आंदोलन यशस्वी होईल, असा विश्वास आहे. याआधी विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले. त्यांना पाठबळ दिले. अन्याय करणारा अहंकारी असेल, तर त्याचा अहंकार मोडावा लागेल.
पीकविम्याची पूर्वीची पद्धत लागू करावी
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीत नांदेड जिल्ह्याचे सर्वात मोठे नुकसान झाले. ७ लाख २८ हजार हेक्टरमधील पिके उद्ध्वस्त झाली. पीकविम्याची पूर्वीची पद्धत लागू राहिली असती, तर नांदेडला २२ कोटी रुपये मिळाले असते. परंतु तसे न होता केवळ 8 कोटी 88 लाख रुपये प्राप्त झाले. त्यामुळे 1 रुपयात पीकविमाही पूर्वीची पद्धत लागू करावी, अशीही मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.