

पंढरपूर : राज्य शासनाने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली आहे. मात्र ही कर्जमाफी लागू करण्यासाठी नियम व अटी घातल्या आहेत. यामुळे यातून अनेक शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे. कजर्माफी म्हणजे सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी आ. रोहित पवार दि.१२ जूनपासून पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
राज्यातील कोणतेही आंदोलन श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन पंढरपुरातून सुरू करण्यात येते. यामुळे या आंदोलनात यश येत असल्याचे दिसून आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या अगोदरही सर्व आंदोलने पंढरपुरातून सुरू केली होती. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगले यश मिळाले असल्याचे दिसून आले होते. विठ्ठल हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा देव आहे. यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाला शेतकरी येतात म्हणून शेतकऱ्यांच्या अडचणी विठ्ठलासमोर मांडून त्या सोडवून घेण्यासाठी आ. रोहित पवार यांनी पंढरपूर येथून अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. १२ जून रोजी आमदार रोहित पवार पंढरपूर येथे येणार आहे. विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा करणार आहेत. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिवतीर्थावर अन्नत्याग आंदोलन करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली आहे; मात्र ही कर्जमाफी करताना नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. यामुळे याचा लाभ ५० टक्के हून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नाही. यामुळे सर्वच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी आ. रोहित पवार पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. तसेच केंद्र व राज्य शासनाने बंद केलेली एक रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.