

Rigorous imprisonment for person who assaulted bus driver
नांदेड, पुढारी वृत्तसेवा शहर बस चालकाला शिवीगाळ, मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ऑटोचालकाला अतिरिक्त सत्र न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश-३ आर. यू. नागरगोजे यांनी हा निकाल दिला. शिवाजी नागोराव पिंपळे (रा. वामननगर, नांदेड) असे दोषी आरोपीचे नाव आहे.
ही घटना १५ मार्च २०११ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली होती. फिर्यादी बसचालक शिवाजी गणपतराव मुंडे हे शहर बस (क्र. MH-26-H-3167) चौफाळा येथून गजानन महाराज मंदिराकडे घेऊन जात होते. त्यावेळी सोमेश कॉलनीकडून आलेल्या आरोपीने आपला ऑटो (क्र. MH-26-G-8205) बससमोर आडवा लावला.
ऑटो बाजूला घेण्यास सांगितल्यावर आरोपीने शिवीगाळ करत चालकाला बसखाली ओढले आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन ७ एप्रिल २०११ रोजी दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.
न्यायालयाने आरोपीस सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली; या दोन्ही शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता रणजीत देशमुख व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पी. व्ही. बुलबुले यांनी बाजू मांडली, तर वजीराबाद पोलिसांनी न्यायालयाच्या पैरवीसाठी सहकार्य केले.