Nanded Garbage Problem : बारडमध्ये ‘स्वच्छ भारत मिशन’ला हरताळ

गावात घाणीचे साम्राज्य; कचरा जाळण्याचा धक्कादायक प्रकार
Nanded Garbage Problem
Nanded Garbage Problempudhari photo
Published on: 
Updated on: 

नांदेड :चोवीस वर्षांपूर्वी ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार प्राप्त करून स्वच्छतेचा नावलौकिक मिळविणाऱ्या बारड (ता. मुदखेड) नगरीत गेल्या काही वर्षांत मात्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. गावातील स्वच्छतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ परिसर आणि नाल्यांमधील घाणीचे चित्र दिसून येते. त्यामुळे गावात स्वच्छ भारत मिशनच्या उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे.

गावातील अनेक भागांत नियमित कचरा संकलन होत नसल्याने ठिकठिकाणी कचरा साचतो. ही बाब गेल्या काही वर्षांत चिंताजनक बनली आहे. घंटागाडी गावातील अनेक गल्ल्यांमध्ये आठ आठ दिवस फिरकतच नसून नागरिकांना नाईलाजास्तव कुठेही केरकचरा टाकावा लागत असल्याची भावना धोंडिबा कोंडीबा आठवले यांनी व्यक्त केली.

Nanded Garbage Problem
Nanded News : डीजे प्रकरणात राजकीय हस्तक्षेप खपवून घेणार नाही!

काही ठिकाणी या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याऐवजी तो उघड्यावर जाळला जात आहे. त्यामुळे परिसरात धूर आणि दुर्गंधी पसरत असून त्यातून निघणाऱ्या विषारी वायूमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. अनेक ठिकाणी नाल्यांची साफसफाई झालेली नसल्याने सांडपाणी आणि साचलेल्या घाणीमुळे अस्वच्छतेची समस्या अधिक गंभीर बनली आहे.

विशेष म्हणजे, ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम पुरस्कार मिळविणाऱ्या बारड गावाची गेल्या काही वर्षांतील ही घसरलेली स्वच्छता व्यवस्था नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पूर्वी स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श निर्माण करणाऱ्या गावात आज नियमित स्वच्छतेसाठीही पुरेशा उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे.

Nanded Garbage Problem
Fake Currency | नाशिकमध्ये बनावट नोटांचा धक्कादायक प्रकार! SBI च्या मशीनमध्ये 500 रुपयांच्या 47 नोटा जमा

दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाकडून मुबलक स्वच्छता कर्मचारी उपलब्ध नसल्याचा दावा केला जात आहे. मात्र, मनुष्यबळाची कमतरता असली तरी कचरा व्यवस्थापन, नालेसफाई आणि सार्वजनिक स्वच्छतेसाठी पर्यायी नियोजन करणे आवश्यक आहे. पुढील आठवड्यात अस्वच्छतेच्या संदर्भात ठोस उपाययोजना करू, अशी प्रतिक्रिया ग्रामसेवक सतीश लाटकर यांनी दिली.

स्वच्छता निधीची चौकशी व्हावी!- गेल्या काही वर्षात बारडमध्ये अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. अस्वच्छतेमुळे गावचे चित्र विदारक बनले आहे. गावातील अनेक भागातील कचराच उचलला जात नसल्याने पंधराव्या वित्त आयोगात स्वच्छतेचा निधी किती आला आणि तो कुठे खर्च झाला ? ही माहिती प्रशासनाने लोकांसमोर सादर करावी.

प्रतापराव देशमुख माजी उपसरपंच, बारड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.