

हदगाव : शहरात बोगस डॉक्टरांकडून सुरू असलेल्या वैद्यकीय व्यवसायाचा आरोग्य विभागाने पर्दाफाश केला आहे. शहरातील डॉ. टीकाकार यांच्या नागमाता दवाखान्यात एका बंगाली बोगस डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार केले जात असल्याची ऑनलाईन तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रदीप स्वामी अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हदगाव यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.
आरोग्य विभागाच्या पथकाने कारवाई केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय मुरमुरे,नरसिंगराव माहूरकर, सतीश छत्रे, साळवे अस्वजित,किरवले संतोष आदींची उपस्थिती होती.
संबंधित डॉक्टराच्या बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसायाची खातरजमा करण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजनपूर्वक सापळा रचला. या कारवाईदरम्यान संबंधित व्यक्तीला प्रत्यक्ष पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यक्तींविरुद्ध आरोग्य विभागाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेणे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी उपचार घेताना संबंधित डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता व वैद्यकीय नोंदणी तपासावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.