

Reservation for the ward of Umri Municipal Council has been announced
राजकीय वार्तापत्र : नरेंद्र येरावार
उमरी: उमरी नगर परिषदेच्या प्रभागाचे नुकतेच आरक्षण जाहीर झाले. कोणती जागा कुणाला सुटली. याची चर्चा सुरू झाली आणि कोणता प्रभाग सुरक्षित आहे. याचीही चाचपणी सुरू झाली असून राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी मात्र कोण लायक उमेदवार आहे, हे शोधण्याची शोध मोहीम सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.
राजकीयदृष्ट्या उमरी नगर परिषदेवर आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत आयाराम गयारामाची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव करण्यात आल्याने इतर गटातील असंख्य इच्छुक उमेदवारांचे नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले आहे. प्रभागाची रचना झाली. त्यात दहा प्रभागांतून प्रत्येकी दोन असे वीस सदस्य आणि जनतेतून थेट नगराध्यक्ष एक असे २१ सदस्य निवडून देण्यासाठी ही निवडणूक होत आहे. आता ११ महिला सदस्य नगर परिषदेत राहतील. त्यामुळे नगरपालिकेच्या इतिहासात पुन्हा एकदा महिला राज येणार हे सिद्ध झाले आहे. परंतु उमरी नगर परिषदेच्या राजकीय कारभारात महिला सदस्य तर निवडून येतात, परंतु त्यांचे पतीराज कारभार पाहतात असे चित्र राहिले आहे.
पालिकेवर सत्तेत येण्यासाठी आघाडी किंवा युती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु सर्वांनीच नगरपालिकेवर आपलीच सत्ता येण्याचा दावा केल्याने पुढे काय होईल याची चर्चा सुरू झाली आहे. नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी.. उमरी नगर परिषदेत आतापर्यंत अनेक सदस्य निवडून गेले. परंतु त्यांच्या कार्यकाळात म्हणावे तेवढे कर्तबगारीचे काम झाले नाही. त्यामुळे मतदार त्यांच्यावर नाराज असून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी होत आहे. त्याच दृष्टिकोनातून राजकीय पुढाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या असून नवीन उमेदवार देण्यासाठी विचारविनिमय केल्या जात आहे. भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व (अजित पवार गट), शिव सेना (उबाठा), (शिंदे गट), वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
प्रभाग रचनेत अनेक भाग वेगळे प्रभाग रचनेत अनेक भाग विभाग वेगळे झाले आहेत. काहींची नावे देखील इतर प्रभागात आली आहेत. बदल झालेली मतदारांची नावे आपल्याच प्रभागात पुन्हा टाकण्यासाठी नगर परिषद कार्यालयात अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांनी राजकीय पुढाऱ्यांची दारे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. परंतु सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय कुणाचीही उमेदवारी जाहीर केली जाणार नाही. याची खबरदारी मात्र घेण्यात येत आहे. त्यामुळे आज या पक्षात अस-लेला भावी नगरसेवक उद्या दुसऱ्याच पक्षात दिसेल, हे मात्र विशेष.