

Trainees under Chief Minister's Training Scheme released from service from bank
विशेष प्रतिनिधी नांदेड : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्हा सहकारी बँकेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून निवडल्या गेलेल्या उमेदवारांमधील काही जणांना बँकेच्या सरळसेवा नोकरभरतीत घुसविण्याचा संचालकांतील काहींचा इरादा होता; पण तो अयशस्वी ठरला असून वरील योजनेतील ३४ उमेदवारांना ३० सप्टेंबर रोजी बँकेतून कार्यमुक्त करण्यात आले.
जिल्हा बँकेमध्ये नोकरभरतीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर वरील योजनेतून बँकेत काम करणाऱ्या उमेदवारांपैकी अनेकांच्या आशा आकांक्षा पल्लवित झाल्या होत्या. या योजनेतील बहुसंख्य उमेदवार वेगवेगळ्या संचालकांच्या शिफारशीनेच प्रशिक्षणार्थी म्हणून बँकेच्या सेवेत आले होते. त्यांच्यातील ३४ जणांची मुदत १७ऑगस्ट रोजी संपली होती, तरी दोन संचालकांनी त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावयास लावल्यामुळे बँकेच्या तिजोरीवर साडेतीन लाखांचा भार पडला.
वरील योजनेमध्ये बँकेने सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ६२ प्रशिक्षणार्थी निवडले होते. ही निवड अर्ज मागवून करण्यात आल्याचे कागदोपत्री दिसत असले, तरी जवळपास सर्वच उमेदवार कोण्या न् कोण्या संचालकाच्या शिफारशीनेच बँकेत आले होते. वस्तुतः बँकेला ३४ उमेदवार घेण्याची अनुमती असताना २८ अतिरिक्त उमेदवार निवडण्यात आल्यामुळे संबंधित यंत्रणेने आक्षेप घेतल्यामुळे ६ महिने पूर्ण होताच २८ उमेदवारांना सेवामुक्त करण्यात आले.
अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भार कोणावर पडला, याची माहिती बाहेर आली नाही. बँकेच्या १६ ऑगस्ट २०२५च्या सभेसमोरील शेवटच्या विषयातून क्र.२१ (५५) वरील प्रकरणाची माहिती समोर आली. वरील योजनेस मार्च २५मध्ये आणखी ५ महिन्यांची मुदतवाढ दिली गेल्यामुळे ३४ युवा उमेदवारांना त्याचा लाभ मिळाला. या सर्वांची मुदत १७ ऑगस्ट रोजी संपणार होती. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या सेवासमाप्तीचा विषय संचालक मंडळासमोर ठेवला होता.
वरील विषय चर्चेला आल्यानंतर दोन संचालकांनी बँकेमध्ये कर्मचारी पुरेसे नसल्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा आग्रह धरला. त्यावर बँक प्रशासनाने आपला अभिप्राय देताना ही मुदतवाढ योग्य नसल्याचे नमूद केले, तरी त्यास न जुमानता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली गेली. बँकेची नंतरची सभा २६ सप्टेंबरला झाली. त्या सभेत या कर्मचाऱ्यांचा विषय पुन्हा निघाला नाही. या पार्श्वभूमीवर आधीच्या बैठकीतील निर्णयानुसार ३४ प्रशिक्षणार्थीना ३० सप्टेंबर रोजी प्रमाणपत्रे देऊन घरी बसविण्यात आले.