

Pethkar family of Bahadurpur praised by PM Modi in 'Mann Ki Baat'
कंधार, पुढारी वृत्तसेवा : कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील सिद्धेश्वर पेठकर यांच्या विवाहसोहळ्याची सध्या संपूर्ण देशात चर्चा होत आहे. पेठकर कुटुंबीयांनी लग्नाचे 'रिटर्न गिफ्ट' म्हणून सुमारे साडेतीन हजार गावकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघाती विमा काढून दिला आहे. या अनोख्या आणि समाजोपयोगी उपक्रमाची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, आजच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून त्यांनी या घटनेची माहिती संपूर्ण देशाला देत पेठकर कुटुंबाचे भरभरून कौतुक केले.
'मन की बात' कार्यक्रमात देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या देशात वाढदिवस किंवा लग्नकार्य हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम नसून तो आनंद इतरांसोबत वाटावा, अशी प्रत्येक कुटुंबाची इच्छा असते आणि त्यातूनच पाहुण्यांना भेटवस्तू दिल्या जातात. परंतु, महाराष्ट्रातील नांदेडमधील बहादरपुरा गावात राहणाऱ्या पेठकर कुटुंबाने आपला आनंद वाटण्यासाठी असा एक निर्णय घेतला आहे, जो सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.
जर आनंद वाटायचाच असेल, तर कठीण काळात एखाद्या कुटुंबाला आधार देणारी गोष्ट द्यावी, या विचारातून त्यांनी घरातील विवाहाच्या निमित्ताने गावातील जवळपास साडेतीन हजार लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली, असे पंतप्रधानांनी सांगितले. या उपक्रमामागील भावना अत्यंत हृदयस्पर्शी असल्याचे सांगत, अपघातानंतर कुटुंबांना येणाऱ्या आर्थिक अडचणींच्या काळात ही छोटीशी मदतही खूप मोठा आधार बनेल, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाची प्रशंसा केली.
खा. अशोक चव्हाणांनी केले नवरदेवाचे अभिनंदन
पंतप्रधानांनी या अनोख्या उपक्रमाची माहिती संपूर्ण देशाला दिल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी नवरदेव सिद्धेश्वर पेठकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे विशेष अभिनंदन केले. फोनवर बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, तुमच्या कुटुंबाने घेतलेल्या या स्तुत्य निर्णयाची दखल थेट देशाच्या पंतप्रधानांनी घेणे, ही नांदेड जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.