

Nanded Municipal Corporation election Sunil Tatkare criticizes MP Chavan
नांदेड, विशेष प्रतिनिधी : नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सध्या मटन आणि बटन’ या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगला आहे. भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी मतदारांना उद्देशून केलेल्या ‘रोज खा मटन, पण दाबा कमळाचे बटन’ या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी खरपूस समाचार घेतला. रविवारी (दि. 11) जुन्या नांदेडमध्ये झालेल्या सभेत तटकरे यांनी, “चव्हाणांकडे एक नाही, तर दोन किलो मटन पाठवा; पण त्यांना आता घरी बसवा,” असा सणसणीत टोला लगावला.
निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांकडून दिल्या जाणाऱ्या पार्ट्यांचा संदर्भ घेत, “खा कोणाचेही मटन, पण दाबा कमळाचे बटन,“ हे वाक्य सर्वप्रथम भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वापरले होते. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनीही मुदखेडमधील सभेत अशोक चव्हाणांच्या विरोधात याच वाक्याचा वापर केला होता.
मात्र, आता खुद्द भाजप खासदार अशोक चव्हाण यांनीच आपल्या एका सभेत या वाक्याचा पुनरुच्चार केल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी चव्हाणांवर टीकेची झोड उठवली होती.
रविवारी नांदेडमध्ये प्रचारासाठी आलेल्या खा. सुनील तटकरे यांनी याच मुद्द्यावरून चव्हाणांना लक्ष केले. निवडणुकीतील हे ‘मटनपुराण’ पुढे नेताना त्यांनी चव्हाणांना घरी बसवण्याचे आवाहन मतदारांना केले. यावेळी जुन्या नांदेडमधील सभेत पक्षाचे स्थानिक नेते आणि प्रमुख उमेदवार उपस्थित होते.
अंतुले यांचे स्मरण अन् मुस्लिम समाजाला साद
खा. सुनील तटकरे यांची ही सभा जुन्या नांदेडमधील मुस्लिमबहुल भागात पार पडली. त्यामुळे सभेला मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी होती. याचे भान राखत तटकरे यांनी आपल्या भाषणात मुस्लिम समाजाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या विविध निर्णयांचा पाढा वाचला. तसेच, यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या आठवणींना उजाळा देत, पक्षाची धर्मनिरपेक्ष भूमिका अधोरेखित केली.