Nanded Fire News : लग्नासाठी जमवलेली पूंजी आणि संपूर्ण संसार आगीत भस्मसात

नियतीचा क्रूर आघात; २ लाख ६० हजारांची रोकड, लग्नाचा संसारोपयोगी साहित्‍य जळून खाक
Nanded Fire News
Nanded Fire Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

लोहा : अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कष्टाची कमाई करत, एक-एक रुपया जोडून मुलीच्या लग्नाची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या पेनूर येथील एका गरीब कुटुंबावर नियतीने घाला घातला आहे. ज्ञानेश्वर गणपती वडे यांच्या घराला शुक्रवारी रोजी सायंकाळी अचानक शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे, महत्त्वाच्या वस्तूंसह मुलीच्या लग्नासाठी जमवून ठेवलेली तब्बल २ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम आणि लग्नासाठी आणून ठेवलेला संपूर्ण पसारा आगीत जळून राख झाला.

या दुर्दैवी घटनेमुळे वडे कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळले असून, उद्याचा संसार उभा करण्यासाठी जमवलेली पुंजीच एका क्षणात राख झाली आहे. घरातील चूल, भांडी, कपडे, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू जळून गेल्याने कुटुंबावर आता उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.

Nanded Fire News
Bhaurao Chavan Sugar Factory : पाच कोटींच्या नोटिशीने शेतकर्‍यांचा आवाज दाबता येणार नाही!

ज्ञानेश्वर वडे यांच्या घराला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आगीचे स्वरूप किरकोळ असल्याचे वाटत असतानाच काही क्षणांत आगीने संपूर्ण घराला आपल्या कवेत घेतले. घरातील साहित्य मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील असल्याने आग झपाट्याने पसरली. कुटुंबीयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीची तीव्रता इतकी मोठी होती की घरातील एकही वस्तू सुरक्षित बाहेर काढणे शक्य झाले नाही. पाहता पाहता संपूर्ण संसार डोळ्यांदेखत जळून खाक झाला. या घटनेने कुटुंबीयांवर मोठा मानसिक आणि आर्थिक आघात झाला आहे.

वडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असून, कुटुंबाने मोठ्या कष्टाने मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा केले होते. रोजच्या गरजा भागवतानाही काटकसर करून २ लाख ६० हजार रुपये रोख रक्कम त्यांनी घरात जपून ठेवली होती.

मुलीच्या लग्नाची तारीख जवळ येत असल्याने लग्नासाठी आवश्यक असलेले धान्य, किराणा आणि अन्य साहित्यही घरात आणून ठेवण्यात आले होते. घरात लग्नाची लगबग सुरू होणार, मुलीच्या हातावर मेहंदी चढणार, नातेवाईकांची लगबग होणार आणि आपल्या लेकीला आनंदाने सासरी पाठवता येईल, अशी स्वप्ने वडे कुटुंबीयांनी रंगवली होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. आगीच्या एका तांडवाने वर्षानुवर्षांच्या कष्टाची कमाई आणि लग्नासाठी केलेली सर्व तयारी क्षणात उद्ध्वस्त केली.

मुलीच्या लग्नासाठी साठवलेली पुंजीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कुटुंबाच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. गरीब कुटुंबासाठी घरातील प्रत्येक वस्तू ही केवळ वस्तू नसते, तर त्यामागे अनेक दिवसांचा कष्टाचा घाम आणि त्याग दडलेला असतो. वडे कुटुंबानेही आपल्या संसारातील प्रत्येक वस्तू जपून ठेवली होती. मात्र आगीने घरातील कपडे, धान्य, भांडी, फर्निचर, घरगुती साहित्य आणि इतर आवश्यक वस्तू काही वेळातच नष्ट केल्या.

Nanded Fire News
Jalna Crime : अंबडमध्ये गावठी कट्ट्याने धमकी; दोन ठिकाणी जमाव भिडल्याने तणाव

घरातील सर्वस्व गमावल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. डोक्यावर छप्पर असूनही उद्याच्या दिवसासाठी आवश्यक असलेले काहीही शिल्लक नसल्याने वडे कुटुंबीयांसमोर आता नव्याने संसार उभा करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. वडे कुटुंबावर आलेल्या संकटामुळे ग्रामस्थ व्यथित झाले आहेत. कुटुंबाने लग्नासाठी जमवलेली रक्कम अशा प्रकारे नष्ट झाल्याने दुःखाचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.