

Part of the protective wall of Renuka Mata temple collapsed
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पुर्णपीठ असणाऱ्या रेणुकामाता मंदिराची एक संरक्षण भिंत कोसळल्याने भाविकांनी दान केलेले अनेक साहित्यांचे मोठे नुकसान झाले. बुधवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली.
विदर्भाच्या सिमेवरील माहूर येथे रेणुकामातेचे मंदिर आहे. या मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाने ७२९ कोटी रुपयांची घोषणा नुकतीच केली. विविध पक्षांच्या नेत्यांचे कुलदैवत असणाऱ्या या मंदिराच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही हे कुलदैवत आहे. वर्षभरापूर्वी गडकरी यांच्या पुढाकारातूनच माहूर येथील स्कॉयवॉकच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी ५० कोटींचा निधीही मंजूर झाला होता. याच योजनेंतर्गत संरक्षण भिंतही बांधण्याचे काम समाविष्ट होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी येथील विकास कामांचा आढावा घेताना संबंधित कंत्राटदाराला तत्काळ संरक्षण भिंत बांधण्याचे आदेश दिले होते.
गेल्या ४-५ वर्षांपासून प्रलंबित कामाला सुरुवात झाली. मुख्य मंदिराच्या पश्चिम बाजूचा भाग संरक्षण भिंतीसाठी पोखरण्यात आला होता. संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू असतानाच बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने २५ मीटर लांब असलेली संरक्षण भिंत अचानक कोसळली त्यामुळे भिंतीलगत असलेल्या खोलीतील साहित्याचे मोठे नुकसान झाले.
भाविकांनी मोठ्या श्रद्धाने जे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केले होते. हे सर्व साहित्य या खोलीमध्ये होते असे सांगण्यात आले. कासवगतीने सुरू असलेल्या या कामाबाबत अनेकवेळा तक्रारी झाल्या. परंतु विश्वस्त किंवा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली, असे मानले जाते.
संबंधित कंत्राटदाराने संरक्षण भिंतीच्या खालपर्यंत जेसीबीद्वारे खोदकाम केले. त्याचाच परिणाम कालच्या पावसाने दिसून आला. सुदैवाने मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे नुकसान झाले नसले तरीही भविष्यात हे काम गतीने व दर्जाचे झाले नाही तर मंदिराच्या गाभाऱ्याला धोका होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.