

Chavan-Bhave meet at the airport; Later travel by the same plane
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या पासष्टीनिमित्त आयोजित व्याख्यानासाठी गेल्या रविवारी नांदेड मध्ये आलेले ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांची सोमवारी सायंकाळी नांदेड विमानतळावर योगायोगाने भेट झाली. नंतर त्यांनी नांदेड - पुणे विमानातून प्रवास केल्याचे समजले.
चव्हाण परिवाराशी भावे यांचे खूप जुने संबंध आहेत. (कै.) शंकरराव चव्हाण यांचा मुंबईतील ज्या पत्रकारांशी खूप निकटचा संबंध राहिला, त्यात यशवंत मोने, जगन फडणीस यांच्यासोबत भावे हेही एक होते. शंकररावांच्या पश्चात भावे यांनी अशोक चव्हाण व त्यांच्या स्थानिक वृत्तपत्राशीही स्नेह राखला; पण अशोक चव्हाण गतवर्षी भाजपात गेल्यानंतर भावे यांनी त्यांच्या राजकीय कृतीवर सडकून टीका केली होती.
गेल्या दीड वर्षांमध्ये चव्हाण आणि भावे यांच्यात वैचारिकदृष्ट्या अंतर निर्माण झाल्यामुळे त्यांच्यात संपर्क - संवाद झाला किंवा कसे ते कळले नाही. पण व्याख्यानाच्या निमित्ताने भावे रविवारी सकाळी नांदेडला आले तेव्हा चव्हाण नांदेड मुक्कामी होते, तरी दोघांच्या निकटवर्तीयांतील कोणीही त्यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग जुळवून आणला नाही किंवा दोघांचे चलभाषच्या माध्यमातून संभाषणही घडवून आणले गेले नाही.
भावे यांच्या रविवारच्या व्याख्यानाला राजकीय व इतर क्षेत्रांतील अनेकांची उपस्थिती होती. भाजपाचे स्थानिक प्रवक्ते संतुका पांडागळे यांनी व्याख्यानानंतर भावी यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी खा. चव्हाण कोठे आहेत, कसे आहेत अशी विचारणा केली. दुसऱ्या दिवशी भावे यांनी कमलकिशोर कदम आणि डॉ. माधव किन्हाळकर या नेत्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या दोघांनीही त्यांना खास निमंत्रित केले होते; पण चव्हाणांच्या निकटवर्तीनी भावे यांच्या संपर्कात येण्याची टाळले. ओमप्रकाश चालिकवार हे त्यास अपवाद होते.
सोमवारी सायंकाळी पुण्याला जाण्यासाठी भावे आणि कमलकिशोर कदम नांदेड विमानतळावर पोहोचल्यावर त्यांची तेथे चव्हाण यांची भेट झाली. चव्हाण आपल्या आमदार कन्येसह पुण्यालाच निघाले होते. भेटीदरम्यान यांनी भावेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. पण राजकीय विषयावर त्यांचा संवाद झाला नाही. पुण्यात विमानातून उतरल्यानंतर चव्हाण यांनी भावेंकडे पुढील प्रवासाच्या व्यवस्थेची चौकशी केली. नंतर या दोघांचा प्रवास वेगवेगळ्या वाहनांतून झाला. भावे ठाण्यातील त्यांच्या घरी सुखरूप पोहचतील, याची सारी व्यवस्था कमलकिशोर कदम यांनी केली होती. नांदेडमध्ये चव्हाण यांची भेट झाली नाही, तरी एकंदर प्रतिसादावर भावे भारावून गेले. या दौऱ्यात त्यांच्यावर ग्रंथ भेटींचा वर्षाव झाला.
अशोक चव्हाण यांनी आ. श्रीजया हिला मधुकर भावे यांची ओळख करून दिली. भावे यांनी तिला लहानपणी अनेकदा पाहिले; पण ती आमदार झाल्यानंतरची पहिली भेट घाईघाईत झाली, तरी या संस्कारी कन्येने भावे यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला. मुंबईत गेल्यानंतर भावे यांनी नांदेडमधील कार्यक्रम आणि भेटीगाठींचा सविस्तर रिपोर्ताज समाजमाध्यमांतून प्रसृत केला.