

Nanded Police Inspector Omkant Chincholkar Transfer After Action Against Sand Mafia
नांदेड : ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची आठ दिवसांपूर्वी नियंत्रण कक्षात बदली झाल्यानंतर त्यांना पुन्हा ग्रामीण पोलिस ठाणे बहाल करण्यात आले आहे. आपल्या पदाची सूत्रे सोमवारी (दि.11) रोजी स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व कर्मचारी व अधिकार्यांना अवैध व्यवसायाबाबत कडक समज दिली आहे.
ग्रामीण पोलिस ठाण्यातील एका जमादाराने काही दिवसापूर्वी एक लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अद्याप या प्रकरणात एसीबीला कोणतीही ठोस पुरावे मिळाले नाहीत. शासकीय नियमानुसार एखाद्या ठाण्यातील कर्मचार्याविरुद्ध एसीबीने गुन्हा नोंदविल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखाची बदली करणे क्रमप्राप्त असते.
एसबीच्या कारवाईत पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलीकर यांचा कोणताही संबंध नव्हता. परंतु, दोन वरिष्ठ अधिकार्यांच्या वादात त्यांचा बळी देत त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. जिल्ह्यातील एक दबंग पोलिस अधिकारी अशी ओळख असणार्या चिंचोलकर यांच्या बदलीने ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत ओमकांत चिंचोलकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारींवर बर्यापैकी अंकुश मिळवला होता. वाळु माफियांचे त्यांनी अक्षरशः कंबरडे मोडले होते. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करताना त्यांनी अनेक गुन्हेगारांचा धिंड काढून माज उतरवला होता. वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या पुढार्यांनी त्यांच्या बदलीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. एसीबीने एका कर्मचार्यावर केलेल्या कारवाईनंतर त्यांची तात्पुरती स्वरुपात नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. या घटनेमुळे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत असलेल्या अधिकार्यांचे मनोधैर्य खचले होते. सोमवारी (11) त्यांची पुन्हा ग्रामीण पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली.
पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानंतर सायंकाळी त्यांनी आपल्या पदाची सुत्रे स्वीकारली. कोणत्याही परिस्थितीत वाळुची अवैध वाहतूक होणार नाही, वाळुचा उपसा होणार नाही, तसेच ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुठलेही अवैध व्यवसाय चालणार नाही, असा सल्लड दम त्यांनी आपल्या अधिनस्त कर्मचारी व अधिकार्यांना दिला. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या मार्गदर्शनानुसार आपले काम सुरु राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड जिल्ह्यातील अधिकार्यांच्या सार्वजनिक बदल्या झाल्या नाहीत. काही मुख्य अधिकार्यांना तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. राज्यातील पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असल्या तरीही अनेक अधिकारी रुजू न झाल्यामुळे बदल्याची प्रक्रिया पुर्ण होऊ शकली नाही.
बोधनकर अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत
ग्रामीण पोलिस ठाण्याचे ओमकांत चिंचोलकर यांच्यासोबतच लिंबगावचे सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनकर यांचीही बदली करण्यात आली होती. या दोन्ही अधिकार्यांनी सकाळी वाळूमाफियांविरुद्ध कारवाई केली. व दुपारी त्यांची बदली झाली. चिंचोलकरांना न्याय मिळाला असला तरी, लिंबगावचे बोधनकर अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.