

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक दृष्टीने पुणे हे अत्यंत महत्त्वाचे शहर बनले आहे. नांदेड ते पुणे व्यावसायिक व शैक्षणिक विद्यार्थी दररोज ये-जा करतात.
सद्यस्थितीत नांदेड ते पुणे दरम्यान दिवसभरात एकही रेल्वे गाडी उपलब्ध नसल्याने प्रवाशांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नांदेड-पूणे-नांदेड वंदे भारत रेल्वे सेवा नांदेड, लातूर, उस्मानाबाद या मार्गाने सुरू करावी, अशी मागणी खा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
त्यांच्या या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, डिसेंबरपर्यंत लातूर रोड रेल्वे स्थानकावर इंजिन बदलणे व परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर इंजिन बदलण्याचा वेळ कमी करण्यासाठी या दोन्ही स्थानकांवर चौर्ड लाईन करणे गरजेचे आहे. याचा फायदा येथेून जाणार्या 10-12 रेल्वे गाड्यांना होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि रेल्वेची आर्थिक बचतही होईल, असेही खा.रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले आहे.