

फुलवळ : नांदेड-उदगीर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर फुलवळ येथे उभारण्यात येत असलेला टोलनाका पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरला आहे. मंगळवारी (दि.12) रात्री साडेआठच्या सुमारास लाईटच्या सोयीअभावी रस्त्यावर पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर मोटारसायकल आदळून झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संथगतीने सुरू असलेल्या कामाविरोधात आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कंधार तालुक्यातील मंगनाळी येथील रहिवासी असलेले रामदास हिरामण अभंगे आणि मारोती रामराव अभंगे हे दोघे आपल्या मोटारसायकलवरून कंधारहून गावाकडे परतत होते. फुलवळ टोलनाक्याजवळ पोहोचताच, रस्त्यावर कोणताही लाईट किंवा धोक्याची सूचना देणारा फलक नसल्याने, बांधकामासाठी टाकलेल्या माती आणि मुरुमाच्या ढिगाऱ्याचा त्यांना अंदाज आला नाही. वेगात असलेली त्यांची मोटारसायकल थेट या ढिगाऱ्यावर आदळली आणि भीषण अपघात झाला.
या अपघातात रामदास अभंगे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले मारोती अभंगे हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी तात्काळ आपल्या पथकाला घटनास्थळी पाठवले. पोलिसांनी जखमी मारोती अभंगे यांना उपचारासाठी कंधार येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
फुलवळ येथील टोलनाक्याचे काम अनेक महिन्यांपासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. या कामामुळे राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अडथळे निर्माण झाले आहेत.
या अपघातामुळे संतप्त नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. "हा राष्ट्रीय महामार्ग आहे की मृत्यूचा मार्ग?" असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणखी किती निष्पाप जीव जाणार, असा प्रश्न विचारला जात आहे. लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभाग या अर्धवट कामाची आणि ठेकेदाराची चौकशी करून रस्त्यावरील अंधार कधी दूर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी धोकादायकच राहणार आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे.