नांदेड-मुंबई हवाई सेवेबाबत खा. चव्हाण यांच्याकडून नवा मुहूर्त !
New Muhurat from MP Chavan regarding Nanded-Mumbai air service!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा येथून मुंबईसाठी हवाई सेवा सुरू व्हावी हा नांदेडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे; परंतु तो सातत्याने लांबणीवर पडत आहे. सोमवारी (दि. ८) खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या फेसबुक पेजद्वारे २५ डिसेंबर हा दुसरा मुहूर्त जाहीर केला असून ही ख्रिसमसची भेट असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी त्यांनी २७ ऑक्टोबर रोजी फेसबुकद्वारे १५ नोव्हेंबरचा मुहूर्त जाहीर केला होता. सुमारे दीड वर्षापूर्वी स्टार एअर विमान कंपनीने नांदेड येथून विविध ठिकाणी हवाई सेवा सुरू केली. तेव्हापासून नांदेड ते मुंबई या मार्गावर विमानसेवा असावी, अशी मागणी जोर धरते आहे. यापूर्वी वेगवेगळ्या कंपन्यांची विमानसेवा सुरू होती, तेव्हा मुंबईची सेवा आवर्जून होती; परंतु यावेळी मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करण्यात येत होते.
आता नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील ताण कमी झाल्याने नांदेडकरांना नांदेड-मुंबई विमानसेवेची प्रतीक्षा होती. दरम्यान, दि. १५ नोव्हेंबरपासून नांदेड-मुंबई व नांदेड-गोवा या दोन हवाईफेऱ्या दररोज सुरू होणार असल्याचे खा. चव्हाण यांनी दि. २७ऑक्टोबरला जाहीर करताना विमानाच्या वेळा सुद्धा जाहीर केल्या होत्या.
प्रत्यक्षात या दोन्ही सेवा सुरू होऊ शकल्या नाहीत. आता खा. चव्हाण यांनी मुंबई-नांदेड-मुंबई ही सेवा दि. २५ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले असून सध्या आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस उपलब्ध असेल; परंतु लवकरच ती दररोज सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
नांदेड-मुंबई विमानसेवेमुळे नांदेडकरांची तर चांगली सोय होईलच. हिंगोली, परभणी, लातूर, वाशिम व हिंगोली, यवतमाळ या पंचक्रोशीतील जिल्ह्यातील प्रवाशांची सुद्धा सोय होणार आहे. सध्या नांदेड येथून दिल्ली, बंगळुरु, अहमदाबाद, पुणे व हैदराबाद या पाच मार्गावर सेवा सुरू असून मुंबई सुरू झाल्यानंतर त्याची संख्या सहा होईल. येत्या काळात गोवासाठी सुद्धा विमानसेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्टार एअरचे संचालन
सध्या नांदेड येथून ज्या वेगवेगळ्या शहरांना हवाई सेवा सुरु आहे, त्याचे संचालन स्टार एअर ही कंपनी करीत असून नांदेड-मुंबई या से-वेची जबाबदारी सुद्धा याच कंपनीने घेतली आहे. कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंग सुरु झाल्याचे खा. चव्हाण यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटले आहे; परंतु नेमक्या वेळा अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. दरम्यान, सायंकाळी ४.२५ वाजता हे विमान मुंबईहून नांदेडला येईल व नांदेड येथून सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी मुंबईला परत जाईल अशी माहिती आहे.

