

Himayatnagar leopard terror in farms
हिमायतनगर: हिमायतनगर तालुक्यात गेल्या आठवड्यापासून बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. बिबट्या वारंवार शेतकरी आणि शेतमजुरांच्या निदर्शनास पडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे कापूस वेचणीसह अन्य शेती कामांसाठी मजूर वर्ग नकार देत असून, रात्री शेतात जागली करणारे सालगडीही भीतीने जागल्या सोडून देत आहेत.
वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वेळोवेळी पाठलाग सुरू केला असला, तरी बिबट्या मात्र वनविभागाला गुंगारा देत आपला दरारा कायम ठेवत असल्याचे चित्र आहे.
वडगाव तांडा येथील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना यापूर्वी घडली होती, ज्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी सतर्क झाले होते.सोमवारी पुन्हा एकदा बोरगडी रस्त्यावरील सोलार पंपच्या शिवारात कापूस वेचणी करणाऱ्या महिलांना बिबट्या दिसला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. सध्या हा बिबट्या वडगाव तांडा, वडगाव ज., सवना, पार्डी, चिचोंर्डी, वारंगटाकळीसह अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला आहे.
बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीचे काम खोळंबले आहे.सध्या गहू, हरभरा, हळद, कापूस या पिकांना रात्रीच्या वेळी पाणी द्यावे लागते. परंतु, बिबट्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी रात्री शेतात जाणे टाळले आहे. दिवसा कापूस वेचणीसाठी महिला मजूर वर्ग येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कामाकडे पाठ फिरवली आहे.
सोमवारी वनविभागाच्या टीमने बोरगडी रस्त्यावरील सोलार शिवारात भेट दिली आणि बिबट्याचा शोध घेतला. मात्र, बिबट्याने पळ काढला. शिवारात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळत असल्यामुळे परिसरातील भीतीचे प्रमाण वाढले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील शिवारात बिबट्याच्या या धुमाकुळामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून, वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.