

संजीव कुळकर्णी
नांदेड ः विख्यात समीक्षक-विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या नावाने राज्यातील पहिली पुरस्कार योजना जाहीर करणाऱ्या तसेच कुरुंदकरांच्या नावाने सर्वाधिक रकमेचा पुरस्कार देण्याची नोंद आपल्या नावावर करणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय राजवटीने मागील चार वर्षांपासून या पुरस्काराचे वितरण केले नसल्याची माहिती समोर आली असून जि.प.ला या पुरस्काराचा विसर पडला आहे काय, असा सवाल कुरुंदकरांच्या चाहत्यांकडून करण्यात आला आहे.
कुरुंदकर यांचे 1982 साली निधन झाल्यानंतर दरवर्षी विविध कार्यक्रम-उपक्रमांद्वारे त्यांची स्मृती जपली जाते. महाराष्ट्र शासनाने एका वाङ्मय पुरस्कारास कुरुंदकरांचे नाव दिले असून हा पुरस्कार 1 लाखाचा आहे. छ.संभाजीनगरच्या मराठवाडा साहित्य परिषदेतर्फेही कुरुंदकरांच्या नावाने एका साहित्यकृतीस दरवर्षी एक पुरस्कार दिला जातो. पण या थोर साहित्यिकाच्या नावे जिल्हा परिषदेतर्फे एक पुरस्कार देण्याचा उपक्रम लेखिका तसेच नांदेड जि.प.च्या माजी सदस्य प्रा.मथु सावंत यांच्या पाठपुराव्यातून सुरू झाला. त्यास जवळपास 30 वर्षे झाली; पण गेल्या चार वर्षांपासून नांदेड जि.प.ने ह्या तसेच सावित्रीबाई फुले पुरस्काराच्या मानकऱ्यांची निवडच केली नाही.
गेल्या शतकाच्या अखेरच्या पर्वात सुरू झालेल्या वरील पुरस्काराचा मान मराठवाड्यातल्या जुन्या तसेच नव्या पिढीतील अनेक साहित्यिकांना मागील काळात मिळाला. 2021-22 या वर्षांत या पुरस्काराची रक्कम 25 हजारांवरून 2 लाख रूपये करण्यात आली. नांदेडचे साहित्यिक दे.भा.फुलारी हे या वाढीव रकमेच्या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले होते.
सन 2022 साली जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी 2017 ते 22 या कालखंडातील सर्व पुरस्कारांचे वितरण होईल, याची खबरदारी तत्कालीन शिक्षण सभापती व अन्य संबंधितांनी घेतली होती. पण प्रशासकीय राजवटीत या पुरस्काराच्या मानकऱ्याची निवड आणि पुरस्कार प्रदान करण्याची बाब ठप्प झाली आहे. तथापि या राजवटीतल्या अर्थसंकल्पांमध्ये वरील पुरस्काराची रक्कम आणि कार्यक्रमासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद करण्यात येते, असे सांगण्यात आले.
नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कार रकमेच्या बाबतीत महाराष्ट्रातील कोणत्याही साहित्यिक अथवा निमशासकीय संस्थेच्या वाङ्मयीन पुरस्कारांपेक्षा मोठा आहे, मानाचाही आहे. प्रशासकीय राजवटीने हा उपक्रम पार पाडू नये, अशी कोणतीही अट पुरस्कार योजनेमध्ये नाही. संबंधित अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे हा उपक्रम खंडित झाल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्ते संदीपकुमार देशमुख बारडकर यांनी केला आहे.
जि.प.च्या शिक्षण विभागाकडे विचारण केली असता, मागील तीन तसेच यंदाच्या पुरस्काराचे वितरण झाले नाही. तथापि त्याबाबतची प्रक्रिया जारी असल्याची माहिती देण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांवर आहे.
एमजीएम संस्थेतर्फे लवकरच पुरस्कार !
नरहर कुुरुंदकर यांच्या साहित्य-समीक्षा आणि महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्रातील बहुमोल योगदानाची नोंद घेऊन महात्मा गांधी मिशन संस्थेतर्फे कुरुंदकर यांच्या नावाने त्यांच्या जन्मदिनी (15 जुलै) एक मोठा पुरस्कार देण्याची बाब विचाराधीन असून त्यासंबंधीचे सूतोवाच या संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी नुकतेच येथे केले. नांदेडच्या वास्तव्यात त्यांनी या विषयावर कुरुंदकर परिवारातील काही सदस्यांशी चर्चा केली.
नरहर कुरुंदकर पुरस्कार योजनेची रक्कम आणि इतर खर्चाची तरतूद जि.प.च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. ह्या पुरस्काराचे वितरण मागील तीन वर्षांत का झाले नाही, याची माहिती आमच्याकडे नाही. वरील विषय प्राथमिक शिक्षण विभागाच्या अखत्यारित येतो.
शिवप्रकाश चन्ना, मुख्य लेखा व वित्त अधिकारी