

भूम : एसटीच्या प्रवासादरम्यान अनेक वाहकांकडून दिव्यांग प्रवाशांची छळवणूक तसेच पिळवणूक होत असल्याचे सांगत अशा उध्दट वाहकांवर कारवाई करण्याची मागणी दिव्यांग संघटनेने केली आहे. या मागणीसाठी त्यांनी शहरात निदर्शने केली.
महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेच्या वतीने परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत निवेदन देण्यात आले. भूम येथील राज्य परिवहन आगार प्रमुखांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान दिव्यांगांची होत असलेली पिळवणूक तत्काळ थांबवून संबंधित कर्मचारी व वाहकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने दिव्यांग ओळखपत्राची पडताळणी भ्रमणध्वनीवरील संगणकीय प्रणालीद्वारे करण्यास परवानगी दिली आहे. मात्र काही कर्मचारी जाणूनबुजून क्रमांक किंवा जन्मतारीख चुकीची नोंदवून ओळखपत्र बनावट असल्याचे सांगतात. पूर्ण भाडे भरण्यास भाग पाडणे, बसमधून उतरविण्याची धमकी देणे किंवा ओळखपत्र जप्त करण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिव्यांगांना बसमध्ये चढ-उतार करताना मदत न करणे, राखीव आसनाबाबत सहकार्य न करणे तसेच पडताळणी प्रणालीचा चुकीचा वापर करून अपमान करणे, असे प्रकार थांबवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके, संस्थापक सचिव रियाज पठाण, राज्य समन्वयक रामहरी चव्हाण, जिल्हाध्यक्ष पांडुरंग मिसाळ, मंगल शिंदे,याशिन बादेला, हनुमंत बोराडे, महिला तालुकाध्यक्ष सुषमा पाटील, विश्वनाथ माळी, केरबा चिखले, सलीम बादेला, अरुण अंधारे, तस्लिम जहागीरदार, रेशमा अलहमीद, आण्णासाहेब माने, हनुमंत रोडगे, अर्जुन झिटे, राजू टाळके, सिंधू टाळके, सूर्यकांत कोळी आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.