

लातूर : आगामी काळात एकापाठोपाठ एक येणारे विविध धर्मीय सण आणि उत्सव शांततेत, उत्साहात आणि निर्विघ्नपणे पार पडावेत यासाठी लातूर पोलिस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 12) पोलिस अधीक्षक कार्यालयात शांतता समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी जिल्हाभरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत, अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला.
बैठकीत प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री, जय सेवालाल जयंती, रमजान महिना व ईद, होळी, धूलीवंदन आणि रंगपंचमी या उत्सवांच्या नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. मिरवणुकांचे मार्ग, संवेदनशील भाग आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने लातूर पोलिसांनी व्यापक बंदोबस्त तैनात केला असून पुढील महत्त्वाच्या उपाययोजना केल्या आहेत.
एसआरपीएफ प्लाटूनसह 960 पुरुष आणि 150 महिला होमगार्डची नेमणूक. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी विशेष मॉनिटरिंग सेल कार्यरत. गुड मॉर्निंग स्कॉड, जीप पेट्रोलिंग आणि पायी गस्त अधिक तीव्र केली आहे. महिला सुरक्षा पथके (दामिनी पथक) विशेष सक्रिय करण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची आखणी.
डीजे आणि ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाच्या नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक आहे.तसेच उत्सवांच्या काळात शांतता भंग होऊ नये यासाठी अवैध मद्यविक्री आणि इतर गैरप्रकारांवर विशेष मोहीम राबवली जाणार आहे. तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 (1) (3) अंतर्गत आवश्यकतेनुसार अधिसूचना लागू करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
बैठकीस अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, विविध पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी व विविध मंडळांचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने शांतता राखण्याचा निर्धार व्यक्त केला.
लातूर हे सुसंस्कृत आणि सर्वधर्मीय समभाव जपणारे शहर आहे. महाराष्ट्रात आपल्या शहराची एक वेगळी प्रतिष्ठा आहे. ही प्रतिष्ठा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा. प्रगतीसाठी जिल्ह्यात शांतता असणे गरजेचे असून, प्रत्येक नागरिकाने सजग राहावे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सण उत्साहात साजरे करावेत.
अमोल तांबे, पोलिस अधीक्षक, लातूर.