

Father Son Death Nanded
सारखणी : दोन वर्षांच्या चिमुकल्यासह पित्याने विहिरीत उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना दहेली (ता. किनवट) परिसरात उघडकीस आली आहे. विक्रम सुरेश मारशेटवार (वय 30) आणि शिवाजी विक्रम मारशेटवार (वय 2) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (दि. ६) सकाळी उघडकीस आली.
दहेली येथील रहिवासी असलेल्या विक्रम मारशेटवार यांनी आपल्या दोन वर्षांच्या मुलासह परिसरातील राजेश संटी दिसलवार यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवन संपविल्याचे निष्पन्न झाले आहे. सकाळी घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ठाणेदार रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष कोंडापेल्लीवार तपास करीत आहेत. मृतांचे शव विच्छेदन दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दुपारी 12.30 वाजता करण्यात आले.
शवविच्छेदनानंतर दोन्ही पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मृत विक्रम मारशेटवार यांच्या पश्चात आई व दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, मृताची पत्नी माहेरी राहत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुढील तपास सुरू आहे.