

Kinwat Wet Drought
किनवट : तालुका प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीनुसार किनवट तालुक्यात खरीप हंगामातील ओल्या दुष्काळावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. नऊ महसूल मंडळांची अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी, म्हणजेच 37 टक्के जाहीर झाल्याने तालुका दुष्काळी घोषित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तालुक्यातील 191 गावांमध्ये पैसेवारी लागू असून एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 81 हजार 74.78 हेक्टर आहे. यापैकी खरीप हंगामात 79 हजार 141 हेक्टरवर पेरणी झाली, तर 2 हजार 228.78 हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. यंदा तालुक्यात तब्बल 12 वेळा अतिवृष्टी झाली असून नऊ मंडळांत मिळून 43 वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस, ढगफुटीसदृश्य सरी, अवकाळी व परतीच्या पावसामुळे खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाला.
पूरस्थितीमुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी सुमारे 56 हजार 634 हेक्टरवरील जिरायती पिकांचे 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीचा फटका 176 गावांतील 51 हजार 488 शेतकऱ्यांना बसल्याचा अहवाल तहसील प्रशासनाने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
एकरी उत्पादनात मोठी घट झाल्याने कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका आणि ज्वारी या प्रमुख पिकांचे उतारे अपेक्षेपेक्षा फारच कमी आले. त्यामुळे तालुक्यात आधीपासूनच ओल्या दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पहिल्या नजर अंदाज आणि नंतरच्या सुधारित पैसेवारीतही 37 पैसेच नोंदवले गेल्याने अंतिम पैसेवारीही त्याच पातळीवर राहण्याचा अंदाज होता. तो अखेर खरा ठरला असून अंतिम पैसेवारी 37 टक्के जाहीर झाल्याने दुष्काळी स्थितीला अधिकृत मान्यता मिळाली आहे.
अंतिम पैसेवारी का असते महत्त्वाची ?
अंतिम पैसेवारी ही केवळ आकडेवारी नसून शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलती, मदत व विविध योजनांचा आधार ठरते. पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आल्यास उत्पादनात मोठी घट झाल्याचे स्पष्ट होते, त्यामुळे नुकसानभरपाई व इतर मदतीचा मार्ग खुला होतो. यामुळे आता शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना लागू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच कृषी, महसूल व ग्रामविकास यंत्रणांच्या संयुक्तिक पद्धतीने करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या अंतिम उत्पादकतेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.