

संजीव कुळकर्णी
नांदेडः शहरालगतच्या वाडी येथील नव्या उपजिल्हा रुग्णालयास सहकार महर्षी श्यामराव कदम यांचे नाव देण्याच्या मागणीने उचल खाल्ल्यानंतर मागील काही वर्षांत नांदेडमधून पूर्वसुरींची स्मृती पुसून टाकण्याच्या बाबतीत झालेली कृतघ्नता समोर आली असून त्यामागचे ‘अशोकचक्र’ चर्चेमध्ये आले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यात शंकरराव चव्हाण यांचे नेतृत्व स्थापित झाले होते. पुढील काही वर्षांत जिल्हा परिषदा-पंचायत समित्यांची निर्मिती झाल्यानंतर शंकररावांचे समकालीन सहकारी त्या माध्यमातून स्थानिक राजकारणात स्थिर झाले. वेगवेगळ्या भागातील काँग्रेस पठडीतल्या या स्थानिक नेत्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात वाव देण्याचे धोरण शंकररावांनी ठेवले; पण पहिल्या पिढीतील नेत्यांच्या अस्तानंतर मागील २५ वर्षांत जिल्ह्याचे नेतृत्व आपल्या हाती केंद्रीत करणार्या नेत्याने केवळ शंकररावांची स्मृती जपण्याचे धोरण राबविल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधातील प्रमुख नेत्यांनी आता श्यामराव कदम यांचे नाव जाणीवपूर्वक पुढे आणले आहे.
वाडीच्या उपजिल्हा रुग्णालयास श्यामराव कदम यांचे नाव देण्याची मागणी येथील सर्वपक्षीय बैठकीत उचलून धरण्यात आली. त्यावर आता भाजपात असलेल्या वरील नेत्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नोंदविली नाही. याच निमित्ताने नांदेडमध्ये वेगवेगळ्या सार्वजनिक वास्तूंना देण्यात आलेली नावे गेल्या काही वर्षांत पुसली गेली, तरी शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर सतत आपला वरचष्मा राखणार्या वरील नेत्याने त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्षच केल्याचे सांगितले जाते.
तत्कालीन नांदेड नगर परिषदेने उभारलेल्या इमारती तसेच संकुलांना जिल्ह्याच्या जडणघडणीतील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे जाणीवपूर्वक दिली होती; पण त्या इमारती पाडून नव्याने बांधलेल्या भव्य संकुलांना त्यांचे नाव देण्याचा व त्या माध्यमातून त्यांची स्मृती जपण्याचा संबंधितांना विसर पडला.
हैदराबाद राज्याचे पहिले गृहमंत्री दिगंबरराव बिंदू यांचे नाव नगर परिषदेच्या नवा मोंढा भागातील मंगल कार्यालयास तर वजिराबाद भागातील बहुउद्देशीय इमारतीस माजी नगराध्यक्ष आणि आमदार-खासदार राहिलेले व्यंकटराव तरोडेकर यांचे नाव दिले होते. मनपाच्या राजवटीत या इमारती पाडून त्या जागी टोलेजंग संकुले उभारताना वरील दोन्ही नेत्यांची नावे हद्दपार करण्यात आली.
नांदेडचे आरंभीच्या काळातील खासदार हरिहर सोनुले यांचे नाव रेल्वे स्टेशन रोडवरील जि.प. इमारतीलगतच्या खुल्या नाट्यगृहास देण्यात आले होते. मागील काळात तेथे वेगवेगळे कार्यक्रमही होत असत; पण अलीकडच्या काळात त्या परिसरातही भव्य संकुल उभारताना खुल्या नाट्यगृहाची जागाही गिळंकृत केली गेली. त्यातून कवी व साहित्यिक म्हणून ओळखल्या गेलेल्या एका आंबेडकरवादी नेत्याचे नावही पुसले गेले. शहराच्या मध्यवर्ती भागातील पूर्वीचे महात्मा फुले मार्केट जमीनदोस्त केले गेले. त्याजागी उभारलेल्या संकुलातून महात्मा फुलेंचे नाव गायब झाले, तरी त्याकडे निमूटपणे बघितले गेले.
नांदेड जिल्ह्याच्या जडणघडणीत शंकरराव चव्हाण यांना दीर्घकाळ सत्तेमध्ये राहण्याची संधी मिळाली, तरी त्यांच्या पूर्वीच्या व समकालीन नेत्यांचेही योगदान महत्त्वाचे होते. शारदा भवन शिक्षण संस्थेत श्यामराव कदम यांनी शंकररावांपेक्षाही जास्त लक्ष घातले, संस्थेसाठी भरपूर वेळ दिला; पण या संस्थेतूनही त्यांची स्मृती जागविण्यात आली नाही. संस्थेच्या वेगवेगळ्या महाविद्यालयांना चव्हाण परिवारातील सदस्यांची नावे देताना श्यामरावांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले. ही संस्था आता अमृतमहोत्सवी पर्वात आली आहे.