

केज : केज तालुक्यात बोगस डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता विना परवाना आरोग्य शिबिरांचा प्रकार समोर आला आहे. साळेगाव येथे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले होते. रुग्णांकडून नोंदणी शुल्क घेऊन विविध वैद्यकीय तपासण्या केल्या जात असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणी करणाऱ्या व्यक्तींकडे वैद्यकीय व्यवसायासंबंधी आवश्यक परवानगी, नोंदणी प्रमाणपत्रे अथवा शैक्षणिक कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शिबिर बंद केले. मात्र, संबंधितांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी साळेगाव (ता. केज) येथील हनुमान मंदिरात उम्मीद एक नयी किरण आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्पर्श हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात रुग्णांकडून प्रत्येकी ५० रुपये नोंदणी शुल्क आकारून तपासणी केली जात होती. अत्याधुनिक एटीएम डिजिटल मशीनच्या माध्यमातून संपूर्ण शरीराची तपासणी करण्याचा दावा करण्यात येत होता.
ईसीजी, स्नायूंचे वस्तुमान, ऑक्सिजन पातळी, हिमोग्लोबिन, अस्थी, नाडी, रक्तदाब, चयापचय, तापमान, रक्तातील साखर, शरीरातील चरबी, पाण्याचे प्रमाण, बीएमआय, बीएमआर यांसह विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जात असल्याचे सांगण्यात येत होते. बाजारात चार ते पाच हजार रुपये खर्च येणाऱ्या तपासण्या अवघ्या ५०० रुपयांत करून देण्याचेही सांगितले जात होते.
या शिबिराची माहिती मिळाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल मुंडे यांच्या सूचनेनुसार ग्रामीण आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिला कांबळे यांनी अचानक भेट दिली. त्यांनी शिबिर आयोजकांकडे आरोग्य तपासणीसाठी आवश्यक परवानगी, संबंधित व्यक्तींची शैक्षणिक कागदपत्रे आणि नोंदणी प्रमाणपत्रांची मागणी केली. मात्र, संबंधितांना कोणतीही आवश्यक कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे डॉ. कांबळे यांनी शिबिरातील तपासणी बंद करण्याची कार्यवाही केली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. शिला कांबळे यांनी माहिती घेतली असता, तपासणी करणाऱ्या सोनिया प्रकाश सैंदाने यांनी आपण बीएचएमएस शिक्षण घेतल्याचे सांगितले; मात्र त्यांच्याकडे वैद्यकीय नोंदणीचे प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. तसेच कृष्णा हरिदास मंजुळकर यांनी आपण डीएमएलटी शिक्षण घेतल्याचे सांगितले; परंतु त्यांच्याकडेही पदविकेचे प्रमाणपत्र आढळून आले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष तपासणी करणाऱ्या व्यक्तींची पात्रता आणि त्यांना अशा प्रकारच्या तपासण्या करण्याचा अधिकार आहे का, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
बोगस डॉक्टरांनंतर आता बोगस शिबिरांचा संशय!
केज तालुक्यात यापूर्वी बोगस डॉक्टरांवर कारवाई झालेली असताना आता विना परवाना आरोग्य शिबिरांचा प्रकार समोर आल्याने आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्वसामान्य नागरिक आरोग्य तपासणीच्या नावाखाली अशा शिबिरांवर विश्वास ठेवतात. मात्र, तपासणी करणाऱ्यांची पात्रता, वापरण्यात येणाऱ्या मशीनची विश्वासार्हता आणि तपासणी अहवालांची वैद्यकीय वैधता याबाबत खात्री नसल्यास रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर खेळ होऊ शकतो. त्यामुळे केवळ शिबिर बंद करून थांबण्याऐवजी आयोजकांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच जिल्ह्यात अशा प्रकारची आणखी किती शिबिरे सुरू आहेत, याची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
पडताळणी करून कारवाई करणार!
या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित शिबिर बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिक चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.