

Umarkhed Woman Ends Life in lake
उमरखेड : लग्नाचे आश्वासन देऊन प्रेमसंबंध ठेवले आणि त्यानंतर लग्नास नकार देत मानसिक त्रास दिल्याने तरुणीने अंबोना तलावात जीवन संपविल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्का तुकाराम वाढवेकर (वय 32, रा. खरूस खुर्द, ता. उमरखेड) हिचे ढाणकी येथील सिद्धार्थ उत्तम गायकवाड याच्यासोबत प्रेमसंबंध होते. अल्काचे यापूर्वी लग्न झाले होते. मात्र, पती मतीमंद असल्याने लग्नानंतर काही महिन्यांतच ती माहेरी आली होती. त्यानंतर तिचे सिद्धार्थसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही विवाह करणार असल्याची माहिती कुटुंबीयांना होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मात्र, सिद्धार्थचे वडील उत्तम गायकवाड, आई, भाऊ शुभम गायकवाड आणि नातेवाईक संबोधी गायकवाड यांचा या संबंधांना तसेच विवाहाला विरोध असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 23 सप्टेंबर रोजी अल्का सिद्धार्थच्या घरी त्याला समजावण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिच्याशी शिवीगाळ करून वाद घालण्यात आला. तसेच सिद्धार्थने लग्नाचे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे सांगून तिला धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यावेळी तिचा मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, 29 सप्टेंबर रोजी अंबोना तलावाच्या पाण्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी चप्पल आणि पर्स मिळाली. पर्समधील आधारकार्डावरून मृतदेह अल्का वाढवेकर हिचा असल्याचे कुटुंबीयांनी ओळखले.
यानंतर अल्काच्या बहिणीने दिलेल्या जबानीवरून सिद्धार्थ उत्तम गायकवाड, उत्तम गायकवाड, सिद्धार्थची आई, शुभम उत्तम गायकवाड आणि संबोधी गायकवाड यांच्याविरुद्ध उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गुंडे करीत आहेत. अल्काच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती, तक्रारीतील आरोपांची सत्यता आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.