

उमरखेड : उमरखेड–ढाणकी रस्त्यावरील किसान वेल्डिंग वर्कशॉपसमोर २६ सप्टेंबर रोजी झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या अप्पाराव बोक्से यांचा उपचारादरम्यान गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्यांचा मुलगा वैभव बोक्से) याचाही या स्फोटात गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे बाप-लेकाचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
२६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास उमरखेड–ढाणकी रस्त्यावरील किसान वेल्डिंग वर्कशॉपसमोर ट्रॅक्टरचे वेल्डिंगचे काम सुरू असताना टायरजवळ असलेल्या हवेच्या सिलिंडरचा भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात अविनाशबेले , सय्यद शहाजेब, सय्यद अनिस यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर शेख जावेद शेख बाबू आणि वैभव बोक्से हे गंभीर जखमी झाले होते.
गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान वैभव बोक्से याला त्याच दिवशी मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर जखमी असलेले अप्पाराव बोकसे यांच्यावरही नांदेड येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेतील सलग पाचव्या मृत्यूंमुळे उमरखेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणातील जखमींच्या उपचाराबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेमुळे एका कुटुंबातील वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याने बोक्से कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.