

नांदेड : माताबाल संगोपन, कुटुंब कल्याण व नियमित लसीकरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नांदेड जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी करत अव्वल टॉप फाईव्ह जिल्ह्यांमध्ये स्थान पटकावले आहे. ऑक्टोबर 2025 अखेर झालेल्या कामकाजाचा राज्यस्तरीय अहवाल 17 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यानुसार जिल्हा व महानगरपालिकानिहाय गुणांकन जाहीर करण्यात आले आहे.
या अहवालात नांदेड जिल्ह्याने माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अहवाल महाराष्ट्र शासनाचे कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व शालेय आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सागळे यांनी पत्राद्वारे प्रसिद्ध केला आहे.
माता आरोग्य कार्यक्रमातील ठळक बाबी
गर्भवती महिलांची 12 आठवड्यांपूर्वी नोंदणी, प्रसूतीपूर्व चार तपासण्या, मातांचे लसीकरण, आयर्नफॉलिक ॲसिड 180 गोळ्यांचे वितरण, अतिजोखमीच्या व तीव्र रक्तक्षय असलेल्या गर्भवतींची ओळख व उपचार, तसेच प्रसूती आरोग्य संस्थांमध्ये करण्याचे प्रमाण या सर्व निर्देशांकांमध्ये नांदेड जिल्ह्याने उद्दिष्टानुसार समाधानकारक कामगिरी केली आहे.
प्रभावी नियोजन व थेट सनियंत्रण
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी आरोग्य यंत्रणा कार्यरत केली. यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, तांडावाडी, वस्त्या, वीटभट्ट्या, साखर कारखाने आदी ठिकाणी अचानक भेटी देऊन थेट सनियंत्रण करण्यात आले.
हे यश एकट्याचे नसून, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली गावपातळीवरील आरोग्य कर्मचारी, अधिकारी व संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे. आगामी काळात राज्यात अधिक वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे देण्यात येईल.
डॉ. संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी