

नरसीफाटा; पुढारी वृत्तसेवा: नरसी शिवारात गुरुवारी (दि.५) सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. चेहरा रक्ताने माखलेला असल्याने मृत व्यक्तीची ओळख पटली नव्हती. रामतीर्थ पोलिसांनी मृताचा फोटो सोशल मीडियावर टाकून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद आहे काय, याचा तपास केला. दरन्यान, मृत व्यक्ती मुखेड तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
नरसी – देगलूर रोडवर लोहगांवे यांची शेती आहे. गुरुवारी सकाळी 55 वर्षे वय असलेला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह शेतात असल्याची माहिती परमेश्वर लोहगावे यांनी रामतीर्थ पोलिसांना कळवली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांनी तपासाला सुरूवात केली. दरम्यान, देगलुर पोलीस ठाण्यात व्यक्ती हरवल्याची नोंद करण्यात आलेली होती. पोलिसांनी नातेवाईकांना संपर्क करून त्यांना मृतदेह दाखवला असता ओळख पटली.
लक्ष्मण कोंडिबा अवधुते (वय 55, रा. सांगवी, ता. मुखेड, ह.मु. शारदानगर, देगलूर) असे मृताचे नाव आहे. मृत व्यक्ती होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून खेडपाड्यात औषधोपचार करीत होती, असे सांगितले जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास संकेत दिघे, पीएसआय शिवराज नरवाडे करीत आहेत.
हेही वाचा