

नांदेड : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'सेफ फूड सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नांदेडमध्ये मोठी धडक कारवाई केली आहे. मुंबई दक्षता पथकाकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एम.आय.डी.सी. नांदेड येथील मेसर्स शिवशंभो ऑईल मिलवर अचानक छापा टाकण्यात आला. या धडक कारवाईत तब्बल २१ लाख रुपयांचा संशयास्पद आणि भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला असून, या ऑईल रिपॅकिंग युनिटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नांदेडमधील एम.आय.डी.सी. येथील प्लॉट नंबर डी-७३ मधील मेसर्स शिवशंभो ऑईल मिल या फर्ममध्ये अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करून विक्रीसाठी भेसळयुक्त खाद्यतेल साठवून ठेवण्यात आल्याचा संशय होता. या माहितीची गंभीर दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी ए. के. दुधहाते यांच्या पथकाने घटनास्थळी प्रत्यक्ष धडक देत ही कारवाई केली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ च्या कलम ३८ (१) (c) अन्वये विविध प्रकारच्या खाद्यतेलाचा एकूण ९,७४४ किलो साठा जप्त करण्यात आला असून, बाजारभावानुसार याची एकूण अंदाजे किंमत २०,९९,५०७ रुपये (सुमारे २१ लाख रुपये) इतकी आहे.
हा संपूर्ण साठा पुढील आदेशापर्यंत सुरक्षित अभिरक्षेत ठेवण्याचे आदेश संबंधित अन्न व्यवसाय ऑपरेटरला देण्यात आले आहेत. तसेच जप्त केलेल्या तेलाचे नमुने प्रयोगशाळेत रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कठोर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) नांदेड परिमंडळ ०१, सु. दा. जिंतुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश चिभडे (अन्न सुरक्षा अधिकारी, गुप्त वार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर), श्रीमती ए. के. दुधाटे व स.वि. कनकावाड यांनी केली आहे.
कारवाईतील जप्त साठा
अन्न सुरक्षा पथकाने जप्त केलेल्या साठ्यामध्ये शेंगदाणा तेल डबल फिल्टर्ड (बॅच सीएच-१०) १६३ किलो किंमत ४३,४६७ रुपये, रिफाइंड सोयाबीन तेल (बॅच एसओ-१०) ४,२२८ किलो किंमत ९,०१,९७४ रुपये, रिफाइंड सूर्यफूल तेल (बॅच एसयू-१०) २,१४३ लिटर किंमत ४,८५,७४६ रुपये, रिफाइंड सूर्यफूल तेल पाकिटे १,३१६ नग किंमत २,८९,५२० रुपये आणि रिफाइंड सोयाबीन तेल पाकिटे ५०० मिलीचे ३,७८८ नग (वजन १,८९४ किलो) किंमत ३,७८,८०० रुपये असा एकूण ९,७४४ किलो साठ्याचा समावेश आहे.