

नांदेड ः जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या ऑपरेशन क्रॅक डाऊन मोहिमेंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एमआयडीसी परिसरातील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी 1 लाख 3 हजार 50 रुपयांच्या मुद्देमालासह चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. याच मोहिमेंतर्गत रविवारी (दि. 10) नांदेड ग्रामीण पोलिसांना एमआयडीसी परिसरात आदित्य वजन काट्याजवळ काही जण जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलीस पथकाने दुपारी 3 वाजेच्या सुमारास सापळा रचून धाड टाकली.
या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, दोन मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल असा एकूण 1,03,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विलास प्रल्हादराव गजभारे (वय 45, रा. गोपाळचावडी),नारायण बळीराम चिटलेवार (वय 50, रा. बळीरामपुर), प्रसाद संजय सूर्यवंशी (वय 23, रा. येळी, ता. लोहा),संदिप धोंडीबा जगदंबे (वय 39, रा. सिडको, नांदेड) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, वसंत केंद्रे, मारोती पंचलिंग, शंकर माळगे, समीर अहेमद आणि धम्मपाल कांबळे यांच्या पथकाने सहभाग घेतला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.