

Operation Breakdown: Nanded Rural Police Seize Illegal Cache of Weapons Worth ₹43 Lakhs
नवीन नांदेड : पुढारी वृत्तसेवा
नांदेड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन ब्रेक डाऊन’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. शहरात अवैध विक्रीसाठी ठेवलेला तब्बल ४३ लाख ४८ हजार रुपयांचा अवैध शस्त्रसाठा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी जप्त केला आहे. बुधवारी मध्यरात्री ही धाडसी कारवाई केली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने बुधवार दिनांक ६ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गुरुद्वारा परिसरात छापा टाकला. यावेळी ही 4796 शस्त्र मिळून आली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी जसवंतसिंघ प्रकाशसिंघ सुखमनी (रा. रामदास नगर नांदेड वय ५०) याला अटक करण्यात आली आहे. या घटनेशी संबंधित इतर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम आणि पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली आहे. ही शस्त्रे कोलंबिया, चीन आणि आमेरिकेतून आल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ३१५ मोठ्या तलवारी, १३५ छोट्या तलवारी, २५७ काळ्या रंगाच्या गुप्त्या, ८१ पांढऱ्या रंगाच्या गुप्त्या, १९८ काळ्या पात्याचे खंजीर, २७५ हिरव्या मुठीचे खंजीर, ११६ ग्रे रंगाचे खंजीर, १५३ पांढऱ्या रंगाचे खंजीर, २४३ पिवळ्या रंगाचे खंजीर, ४१७ इतर छोटे खंजीर, २ हजार ५५० छोटे फोल्डिंग खंजीर, २८ कुकरी खंजीर, २८ फोर फिंगर ग्रीप खंजीर तसेच स्क्रू ड्रायव्हर, पकड, हातोडे, पाणे व इतर साहित्याचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन कारवाईची पाहणी केली. जिल्ह्यात शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असा कडक इशाराही त्यांनी दिला. नांदेड पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध शस्त्रव्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्य नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे जोरदार कौतुक होत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चिंचोलकर, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड, वेंकट कुसमे तसेच पोलीस अमलदार वसंत केंद्रे, संतोष पवार, सचिन चावरे, समीर अहमद, शंकर माळगे आणि धर्मपाल कांबळे यांनी केली.या कारवाईचे पोलीस दलात पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांचे कौतुक होत आहे
आतापर्यंतची राज्यातील सर्वात मोठी कारवाई
जप्त करण्यात आलेल्या या शस्त्रसाठ्याची एकूण किंमत ४३ लाख ४८ हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या शस्त्रांची राज्यासह इतर राज्यात तस्करी होत असल्याची शक्यता आहे. आतापर्यंत कोणत्या शहरात किती शस्त्र पाठवण्यात आले याचा पोलीस तपास करत आहेत.
पोलीस ॲक्टिव्ह मोडवर
नांदेड शहरात ५ खून झाल्यानंतर जिल्हा पोलिस ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. पोलीस अधीक्षक विविध पथकांसह रात्रभर दुचाकीवर गस्त घालत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी शहरातील शंभरावर गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई केली आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.